शेयर बाजाराची विक्रमी घौडदोड सुरुच; 'एनएसई'मधील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य ४ ट्रिलियन डॉलर्सवर

03 Dec 2023 15:29:11

nse
 
नवी दिल्ली: भारतातील प्रमुख शेयर बाजार असलेला नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य ४ ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे. एनएसईने हा विक्रम १ डिसेंबर रोजी केला. दि. दि.३ डिसेंबर रोजी एनएसई इंडियाने एका प्रसिद्धीपत्रात ही माहिती दिली.
 
१ डिसेंबर रोजी एनएसईची निफ्टी ५० निर्देशांकाने २०,२९१.५५ अंकांचा नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला. त्यासोबतच निफ्टी ५०० निर्देशांकाने देखील १८,१४१.६५ अंकाची ऐतिहासिक पातळी गाठली. एनएसईच्या शेयर बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रमी गुंतवणूकीमुळे एनएसईमधील सुचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य ४ ट्रिलियन डॉलर इतके झाले.
 
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) हे कॅलेंडर वर्ष २०२२ साठी फ्युचर्स इंडस्ट्री असोसिएशन (FIA) द्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ट्रेडिंग व्हॉल्यूम (करार) नुसार जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे. त्याबरोबरच जागतिक पातळीवर इक्विटी बाजारामध्ये एनएसईचा क्रमांक तिसरा आहे. इलेक्ट्रॉनिक किंवा स्क्रीन-आधारित ट्रेडिंग लागू करणारे एनएसई हे भारतातील पहिले एक्सचेंज होते. एनएसईने १९९४ मध्ये देशात आपल्या कामाला सुरुवात केली होती. स्थापनेच्या एका वर्षातच एनएसई एक्विटी शेयरमध्ये दैनंदिन उलाढालीच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठा स्टॉक एक्स्चेंज म्हणून, नावारुपाला आला होता.
Powered By Sangraha 9.0