ऐन हिवाळ्यात दुष्काळ झळा!

03 Dec 2023 21:30:40
Article on Nashik unseasonal-rains-cause-huge-damage-to-crops

नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. ऐन हिवाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने आगामी काळात काय गंभीर स्थिती होईल, याची चिंता आहे. जिल्ह्यातील ३६८ गाव-वाड्यांना टंचाईच्या झळा बसत आहे. एरवी उन्हाळ्यात काही गावांमध्ये टंचाईचे संकट भेडसावत असते; मात्र यावर्षी पावसाळा आणि हिवाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने गाव पातळीवर पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच जिल्हा पातळीवर नियोजन करावे लागेल. यंदा बहुतांश भागांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. परिणामी, अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची गरजही पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे. हिवाळ्यात सात तालुक्यांत टँकरने पिण्याचे पाणी उपलब्ध करावे लागत आहे. सध्या १३१ गावे आणि २३७ वाड्यांना १०४ टँकरद्वारे पाणी दिले जाते. टँकरच्या दिवसभरात २४० फेर्‍या होतात. नांदगाव तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. या एकाच तालुक्यात १९९ गावं आणि वाड्यांना ३५ टँकरने पाणी दिले जात आहे. येवला तालुक्यात ६० गावे, मालेगाव २७, चांदवडला २८, सिन्नरला नऊ गावे वाडे, देवळा २३ गाव-वाडे आणि बागलाण तालुक्यात २२ गाव वाड्यांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. हिवाळ्यात टँकरची संख्या शंभरीपार गेली आहे. दुष्काळाची तीव्रता पाहता, पुढील काळात टँकरची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता पाण्याची नासाडी तातडीने थांबवणे गरजेचे आहे. ते वाया गेल्यावर परत उपलब्ध होत नाही. म्हणून पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल? यावर विचार होणे आवश्यक आहे. मोठे धार्मिक विधी, कथा, प्रवचने यांवर बंधने घालून तो पैसा दुष्काळी भागातील लोकांसाठी किंवा वृद्धाश्रम, अनाथआश्रम अशा ठिकाणी दिला तर सत्कारणी लागेल. कारण, या काळात जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, हाताला काम अतिशय गरजेचे राहणार आहे. दुष्काळाच्या झळा फक्त ग्रामीण भागातच बसतात असे नाही. सर्वच क्षेत्रांवर त्याचा विपरित परिणाम होतो. या काळात टंचाईमुळे मनस्थिती बिघडते. त्यामुळे कठीण परिस्थितीत फक्त तग धरून राहणे व प्रत्येकाची मानसिकता टिकवून ठेवण्याची गरज आहे.

पदभरतीला उजाडणार नववर्ष!

शहरातील मनपाच्या आरोग्य विभागात पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने मनपा रुग्णालये व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र आहे. यामुळे सद्यःस्थितीत डॉक्टर व कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचे चित्र आहे. तसेच नागरिकांवर उपचाराच्या योग्य सुविधा मिळत नसल्याची ओरड केली जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंत्राटी पद्धतीने प्रशासनाने विविध संवर्गांतील ९६ डॉक्टरांची पदासाठी भरती राबवत, मुलाखती घेण्यात आल्या. स्थायी समितीने यासाठी येणार्‍या अडीच कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. या पदांमुळे रुग्णालयांवरील ताण दूर होऊन, रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. मनपाच्या आरोग्य विभागात एकूण ९३३ पदे मंजूर असून, त्यापैकी तब्बल ४६३ पदे रिक्त आहेत. अवघ्या ४७० मनुष्यबळावर रुग्णालयाचे काम सुरू असून, अतिरिक्त ताणामुळे सेवेवर परिणाम होत आहे. मनपाकडून तांत्रिक, आरोग्य व वैद्यकीय अशी ७०६ पदांची भरती केली जाणार होती. पण, ’अ’ संवर्गातील पदभरती ही ’महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’मार्फत होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांची ८२ पदे वगळता आरोग्य विभागातील इतर पदे भरली जाणार आहेत. पण, त्यासदेखील नवीन वर्ष उजाडण्याची चिन्हे आहेत. सध्या अपुर्‍या मनुष्यबळावरच गाडा हाकताना, आरोग्य विभागाची दमछाक होत असून, त्यांनी सहा महिन्यांसाठी विविध संवर्गांतील ९६ डॉक्टरांची पदे तातडीने भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अर्ज प्राप्त डॉक्टरांच्या मुलाखती पार पडल्या. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. आयुक्तांनी या कंत्राटी डॉक्टरांना सहा महिन्यांसाठी मनपा आरोग्य सेवेत रुजू करून घेण्यास मंजुरी दिली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या दिमतीला नवी फौज मिळणार आहे. त्यांच्या वेतनावर अडीच कोटी इतका खर्च येईल. महापालिका आरोग्य विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची प्रचंड कमतरता असून, रुग्णांची उपचाराअभावी मोठी गैरसोय होत आहे. महापालिकेचा आकृतिबंध मंजूर नसल्याने आरोग्य विभागात मागील अनेक वर्षांपासून डॉक्टर भरती झालेली नाही. त्यावर मार्ग काढत, आरोग्य विभागाने विविध संवर्गांतील ९६ डॉक्टरांची कंत्राटी भरती प्रक्रिया राबवली. या उमेदवारांच्या मुलाखतीही झाल्या असून, त्यांच्या भरतीला स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच डॉक्टरांचे नवे पथक मनपात रुजू होणार असून, आरोग्य यंत्रणेवरील भार कमी होण्यास मदत होईल, अशी आशा आहे.
 
गौरव परदेशी 
Powered By Sangraha 9.0