मुंबई : हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज पुरस्कारांपैकी एक असलेला फिल्मफेअर पुरस्कार २०२४ चा सोहळा यावेळी गुजरातमध्ये रंगणार आहे. 'फिल्मफेअर' पुरस्काराचे यंदाचे हे ६९ वे वर्ष असून या पुरस्कार सोहळ्यात देखील नव्या-जुन्या कलाकारांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. २८ जानेवारी २०२४ रोजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये 'फिल्मफेअर २०२४ चा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
दरम्यान, २०२३ या वर्षातील फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपले स्थान मिळवणारा ‘गोदावरी’ चित्रपटाचा डंका पाहायला मिळाला होता. जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. तसेच, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन, सर्वोत्कृष्ट पटकथा निखिल महाजन, प्राजक्त देशमुख, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र आणि जितेंद्र जोशीला बेस्ट क्रिटिक्स अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला होता.
याशिवाय ‘बालभारती’ चित्रपटासाठी आर्यन मेघनजी याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून तर ‘वेड’ चित्रपटातील खुशी हजारेला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.