भूमिगत मेट्रोत ‘क्रॉसओव्हर’ची यशोगाथा

‘एमएमआरसीएल’ची कौतुकास्पद कामगिरी ; स्थलांतर न करता मोहीम केली फत्त

Total Views |

sahar road crossover


मुंबई दि.२८:
बहुप्रतिक्षित भूमिगत मेट्रोचे काम वेगाने सुरू असून, सहार रोड मेट्रो स्थानक आणि ‘क्रॉसओव्हर’ त्यापैकीच आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून बांधण्यात आले आहे. देशात प्रथमच वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम शैलीचा वापर करून ही कामगिरी यशस्वी करण्यात आली आहे. मुंबई बेटावरील असंख्य आव्हानात्मक परिस्थितींवर मात करत मुंबईकरांसाठी पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गिका ‘मेट्रो 3’चे काम करण्यात येत आहे. या बांधणीसाठी वापरण्यात आलेल्या पद्धतीचा वापर भारतात प्रथमच करण्यात आला. मोठ्या नागरी वस्तीची सुरक्षितता आणि ‘कोविड’दरम्यान स्थलांतरणाचे आव्हाने लक्षात घेता क्रॉसओवरसाठी उत्खनन सर्वाधिक आव्हानात्मक होते, अशी माहिती ‘मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड’ (एमएमआरसीएल)च्या अधिकार्‍यांनी दिली आहे. मुंबईतील कुलाबा ते सिप्झ या पहिल्या भूमिगत मेट्रो रेल्वे मार्गिकेची कामे प्रगतिपथावर आहे. या मार्गिकेच्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील मार्गिकांची कामेही अंतिम टप्प्यात आहे. सहार मेट्रो स्थानकाचे बांधकाम त्यापैकीच एक असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये आणि देखभालीच्या दृष्टिकोणातून सहार मेट्रो स्थानकाच्या उत्तरेला ‘क्रॉसओव्हर’ देण्यात आला आहे.


क्रॉसओव्हर म्हणजे


क्रॉसओव्हर म्हणजे ट्रेनला अपलाईन आणि डाऊनलाईन ट्रॅकदरम्यान आपला मार्ग बदलण्याची परवानगी देण्यासाठी क्रॉसओव्हर तयार केला जातो. सहार मेट्रो स्थानकाच्या क्रॉसओव्हरच्या वरचा जमिनीचा भाग झोपडपट्ट्यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे बोगदा खणत असताना जमीन ढासळू नये आणि सुरक्षितरित्या बांधकाम पूर्ण केले जावे, यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून हा बोगदा बांधण्यात आला. टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्टीयन टनेलिंग मेथड अर्थात ‘एनएटीएम’ पद्धतीने हा बोगदा बांधण्यात आला. जर ही पद्धत वापरली नसती, तर झोपडपट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावे लागले असते.


बोगद्यासाठीच्या पोकळीला त्वरित आवरण आवश्यक


जेव्हा जमिनीत बोगदा किंवा गुहा तयार केली जाते. तेव्हा तयार झालेल्या पोकळीला त्वरित आधार देणे आवश्यक आहे. जेणेकरून ती पोकळी कोसळू नये. याला प्राथमिक अस्तर म्हणतात. ही केवळ एक तत्काळ तरतूद आहे. दुय्यम अस्तर किंवा कायमस्वरूपी अस्तर नावाचा दुसरा प्रकार आहे जो संरचनेचे आयुष्य वाढविण्यासाठी वापरला जातो. ‘मेट्रो 3’मध्ये दुय्यम अस्तराचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला.


संरचनेचे आयुष्य 125वर्षे टिकते

बोगद्याच्या मजबुतीकरणासाठी ‘एमएमआरसीएल’ने दुय्यम आवरणांसाठी स्टील फायबर मिश्रित काँक्रीट वापरण्याचा पर्याय स्वीकारला. या प्रकारात बोगद्यांचे मजबुतीकरण करण्यासाठी काँक्रीटमध्ये स्टील फायबरचे मिश्रण असते. असे हे स्टील फायबर मिश्रित काँक्रीट बोगद्याच्या पोकळीवर नळीच्या साहाय्याने प्रचंड ताकदीने आणि रोबोटिक फवारणी मशीन वापरून अचूकपणे फवारले जातात. ही प्रक्रिया अतिशय वेगवान आहे. भारतातील मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आवरणाच्या मजबुतीकरणासाठी पहिल्यांदाच ही पद्धत वापरण्यात आली आहे. यामुळे एखाद्या संरचनेचे आयुष्य अंदाजे 125 वर्षे इतके काळ टिकू शकते.

‘एमएमआरसीएल’च्या शिरपेचात मानाचा तुरा

मुंबईतील बहुतांश परिसर हा झोपडपट्टी आणि मुंबईतील जुन्या हेरिटेज (जागतिक वारसा हक्क) इमारतींनी व्यापलेला आहे. झोपड्यांना आणि हेरिटेज इमारतींना धक्का लागू न देता त्यांच्या खालून जाणार्‍या बोगद्याच्या बांधकामांसाठी कोणतेही स्थलांतर न करता ‘एमएमआरसीएल’ने हे आव्हानात्मक बांधकाम पूर्ण केले. या कामगिरीचे कौतुक होत आहे.
क्रॉसओव्हरची वैशिष्ट्ये

लांबी : 227 मी (अंदाजे)
प्रकार : सिझर (कात्री) प्रकार
एनएटीएम विभाग

सर्वांत मोठी खोली : 10.39 मी.
सर्वात मोठी रुंदी : 16.20 मी.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.