दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणी संबंधित कलाकार मंडळी उपोषणाच्या तयारीत

28 Dec 2023 12:23:57

damodar natyagruha 
 
मुंबई : मुंबईच्या सांस्कृतिक आणि रंगभूमीवरील इतिहासाची गौरवशाली परंपरा जोपासत परळच्या दामोदर नाट्यगृहाने गेल्यावर्षी शतकी वाटचाल पूर्ण केली. दि. 1 नोव्हेंबर 23 पासून दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणीसाठी बंद आहे आणि त्याचे तोडकामही सुरू झाले होते मात्र आता नाट्यगृहाच्या पुरर्बांधणीच्या संदर्भात सत्य उघडकीस आल्यावर कलाकार मंडळी उपोषणाच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या नावाखाली ते जमीनदोस्त करण्याचा डाव आहे. दामोदर नाट्यगृहाच्या प्रस्तावित पुनर्बांधणीमध्ये नाट्यगृहाच्या जागेवर खाजगी सीबीएसई शाळेची वास्तू उभारली जात आहे. भविष्यात नंतर दुसरीकडे छोटेसे नाट्यगृह बांधून त्याचा एफएसआय दुसरीकडे वापरला जाण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 
500 आसनक्षमतेच्या प्रस्तावित मिनी थिएटर मध्ये मराठी नाटक आणि लोककला प्रकार जगणार नाहीत. या पूर्वीच्या नुतनीकरणात 803 च्या ऐवजी 763 सीट्स नाट्यगृहात उरल्या. आताच्या पूर्णबांधणीमध्ये 763 सीट्स ऐवजी "प्रस्तावित 500 सीट्स मध्ये नाट्यगृह नव्हे तर नाट्यगृहाचे स्मारक उभे राहिल" अशी भीती येथील नाट्यकर्मीनी व्यक्त केली.
नाट्यगृहाच्या अशा चुकीच्या पुनर्बांधणी विरोधात दामोदर नाट्यगृहाचा एक भाग असलेल्या सहकारी मनोरंजन मंडळ आणि मराठी नाट्यकलावंतांनी आंदोलन छेडले आहे.
 
'पुनर्निर्माण करायचं झालंच तर नाट्यगृह अधिक मोठे आणि अत्याधुनिक उभारले जावे. सहकारी मनोरंजन मंडळाला पूर्वीप्रमाणेच त्या नाट्यगृहात कार्यालयाची जागा द्यावी, नाट्यगृहाशी संबंधित कर्मचाऱ्यांना तोपर्यंत इतर उपक्रमात सामावून घ्यावे' आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. मात्र सोशल सर्व्हिस लीग संस्थेकडून याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उलट आंदोलन छेडल्याचा राग मनात धरून कोणतीही पूर्वसूचना न देता सहकारी मनोरंजन मंडळाच्या कार्यालयाची वीज आणि पाणी पुरवठा गेल्या महिनाभरापासून बंद केला आहे. याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. यामुळे व्यथित होऊन आता कलाकार मंडळी आता उपोषण करण्याचा तयारीत आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0