छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी मविआला दणका दिला आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या १२ जागा मिळवण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे वंचित बहुजन आघाडीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्यास काँग्रेस, उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी या चारही पक्षांमध्ये समान जागांचे वाटप व्हावे, असे या बैठकीत ठरले. त्यानुसार, महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून यापैकी वंचित बहुजन आघाडीने १२ जागा मिळण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीमध्ये समावेश होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, अद्याप तशी कुठलीही घडामोड घडली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या ४८ जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. काहीच होत नसेल तर आम्ही लोकसभेच्या ४८ जागा मोठ्या ताकदीने लढवू, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेच्या १२ जागा मिळण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.