काँग्रेसच्या 'जाहीरनामा समिती'त महाराष्ट्रातील एकाही नेत्याला स्थान नाही

27 Dec 2023 18:53:03
Congress Manifesto Committee News
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 'इंडी' आघाडी उघडणाऱ्या काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच जाहीरनामा समिती स्थापन केली. मात्र, त्यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या राज्यातील नेत्यांवर काँग्रेसचा 'भरवसा नाय का?', अशी चर्चा प्रदेश काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत मानाचे स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवणाऱ्या जाहीरनामा समितीत राज्यातील एकाही नेत्याचा समावेश न झाल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. विशेषतः तेलंगणासाठी मेहनत घेणारे माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांना या समितीत घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, हायकमांडने त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही. त्यामुळे या पहिल्या फळीतील नेतृत्त्वात नाराजी पसरली आहे. कोणीही उघडपणे बोलत नसले, तरी अंतर्गत धसफूस आहेच.
 
राहुल गांधींनाही वगळले

काँग्रेसची जाहीरनामा समिती पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. टी. एस. सिंहदेव यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी असेल. यात एकूण १६ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सिद्धारामय्या, शशी थरूर, जयराम रमेश, प्रियंका गांधी, आनंद शर्मा, गायखंगम, गौरव गोगोई, प्रवीण चक्रवर्ती, इमरान प्रतापगढी, के. राजू, ओमकार सिंह मरकाम, रंजीत रंजन, जिग्नेश मेवाणी आणि गुरदीप सप्पल यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाही या समितीत घेण्यात आलेले नाही.
Powered By Sangraha 9.0