
लखनऊ : अयोध्येत दि. २२ जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. यातच आता रेल्वेकडून सुद्धा मोठी अपडेट आली आहे. ३० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांनी सोमवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अमृत भारत ट्रेनची पाहणी केली. यावेळी अश्विनी वैष्णव म्हणाले की, "अमृत भारत ही ट्रेन नव्या भारताची ट्रेन आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील कार्यक्रमात दोन ट्रेनचे लोकार्पण करणार आहेत. यातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन उत्तर प्रदेशातील अयोध्या ते बिहारमधील दरभंगा स्टेशन पर्यंत धावेल. त्यासोबतच, दुसरी ट्रेन बेंगळुरू ते मालदा अशी धावेल. भविष्यात राम जन्मभूमी मंदिरामध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, अयोध्येची कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येत आहे. अयोध्येतील हवाईतळाचे सुद्धा लवकरच उद्घाटन होणार आहे. त्यासोबतच अयोध्येच्या रेल्वे स्टेशनचे विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.