मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकांबाबत एक मोठे विधान केले आहे. कुणी सोबत नसेल तर ४८ जागा ताकदीनं लढू, असा इशारा त्यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. साने गुरुजींच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या संविधान निर्धार सभेत ते बोलत होते.
राज्यात सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. परंतू, याबाबत अद्याप मविआच्या कोणत्याच पक्षाने ठोस भुमिका घेतली नाही. यावरून आता प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना इशाराच दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "उद्या जर हे एकत्र येणार नसतील आम्हाला संपुर्ण ४८ च्या ४८ जागा लढवाव्या लागेल. त्याही ताकदीने लढवल्या पाहिजे. उद्या काय होईल ते सोडून द्या, पण रिलिजीयस आयडेंटी तुम्ही क्रॅक करता आणि चळवळीची आयडेंटीटी पुन्हा प्रस्थापित करता हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे," असेही ते म्हणाले.