आरक्षणप्रश्नी उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला; म्हणाले, "कायदेशीर बाबी..."

23 Dec 2023 17:11:37

Uday Samant & Manoj Jarange


पुणे :
लग्न झाल्यानंतर पत्नीची जात मुलांना मिळत नाही हा देशात सगळीकडे नियम आहे. त्यामुळे यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून बघाव्या, असा सल्ला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगेंना दिला आहे. शनिवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
उदय सामंत म्हणाले की, "लग्न झाल्यानंतर पत्नीची जात मुलांना मिळत नाही हा देशात सगळीकडे नियम आहे. त्यामुळे यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून बघाव्या, अशी माझी जरांगेंना विनंती आहे. निजामकालीन नोंदी असलेल्यांना दाखले द्यायला सुरुवात केली असून इतर लोकांसाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्यात येत आहे. इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी ३६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय फेब्रुवारीमध्ये एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णयही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आहे."
 
"रक्तसंबंधातील सगे सोयरे याची व्याख्या वडिलांकडचे नातेवाईक असा होतो, असे तज्ञांचे मत आहे. देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं. सुप्रीम कोर्टातही एक वर्ष टिकलं. मग सरकार गेल्यानंतर का गेलं, याचं उत्तर काही लोकांनी द्यायला हवं. मनोज जरांगेंनी याकडे समजूतदारपणे बघितलं पाहिजे," अशी विनंती त्यांनी केली आहे. छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. एखाद्या समाजात तेढ निर्माण होत असेल तर त्याठिकाणी जाऊन त्यांची समजूत काढणं ही सरकारची जबाबदारी आहे," असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0