खरं तर या पुस्तकाच्या नावानेच मला त्याच्याकडे आकर्षित केलं. ’डार्क हॉर्स’ म्हणजे नक्की काय, हे समजून घेण्यासाठी म्हणून मी हे पुस्तक घेतलं. जेव्हा हे पुस्तक वाचायला सुरुवात केली, तेव्हापासूनच पुस्तकाने उत्सुकता वाढवयाला सुरुवात केली. या पुस्तकात आपल्याला बर्याच वेळा उपहासाची भाषा वाचायला मिळेल. पण, त्या भाषेवर असलेली लेखकाची पकड उत्तम आहे.
’डार्क हॉर्स’चे कथानक ही केवळ कल्पना नव्हे, तर ’सिव्हिल सर्व्हिस’ची तयारी करणार्या प्रत्येक विद्यार्थ्याची ती आत्मकथा आहे. ज्यात तयारी करण्याशिवाय इतर सर्व बाजू, मग तो कोचिंग क्लास असो की वर्तमानपत्र, टिफिनचा डबा असो, विषय निवड करणे असो, ‘पीटी’ची तयारी करणे असो, नैराश्य आलं की मग दारू पिणे, सिगारेट ओढणं, नवीन पार्टनर मुखर्जी नगरमध्ये दाखल झाला की मग पार्टी करणे असो किंवा नेहरू, गांधी, ओबामा, अमेरिका, इराण इकडच्या आर्थिक उलाढालीचा आपल्या देशात होणारा बदल असो, असं सगळं काही इथे निर्भीडपणे मांडले आहे.
लेखकाने अतिशय सोप्या शब्दांत सिव्हिल सर्व्हिसची तयारी करताना, प्रत्येक विद्यार्थ्याची जी मानसिक अवस्था होते, जे प्रश्न कायम त्याच्या मनात फेर धरत असतात, दिवसरात्र एक करून अभ्यास करणे म्हणजे काय, चांगल्या नोट्स मिळवण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत, हे उत्तमरित्या मांडलं आहे. दिल्लीच्या मुखर्जी नगरमधील माहोल कसा असतो, प्रत्येक गल्लीबोळात मुलांचे भविष्य घडवण्यासाठी तयार असलेले आणि स्वतःचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल, हे बघणारे खंडीभर क्लासेस याचे वर्णन वाचताना कधी-कधी वाटते की, आपणसुद्धा त्या क्लासमध्ये प्रवेश घेतला आहे आणि आता आपल्याला ’युपीएससी’ व इतर स्पर्धा परीक्षा द्यायची आहे व ’आयएएस’ अधिकारी बनायचे आहे.
मुखर्जी नगरमध्ये येणारी जास्तीत जास्त मुले ही बिहार व बंगाल, आसामची. त्यांच्या गावाकडच्या राहणीमानात असलेला फरक, त्यांचे घरातील संस्कार, आई-वडिलांच्या मुलांच्या कडून असलेल्या अपेक्षा, शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेले आईवडील तसेच आई-वडिलांनी शिक्षणासाठी केलेल्या आर्थिक मदतीच्या ओझ्याखाली पार पाठ चेपून गेलेले हे विद्यार्थी. दोघांच्या मनातील संघर्ष वाचून एकंदरीत वातावरण कसं असते, ते समजते.
लहापणापासूनच नेहमी ऐकलेले असते की, डॉक्टर बनून तुम्ही स्वतःच करिअर घडवू शकता, इंजिनिअर होऊनसुद्धा तुम्ही स्वतःच करिअर घडवू शकता; पण तुम्हाला स्वतःबरोबरच आपल्या अनेक पिढ्यांचे करिअर घडवायचे असेल, तर ’आयएएस’ व्हायला हवं. आपल्या घरातील मुलगा ’आयएएस’ झाला, तर नक्कीच आपल्या तीन पिढ्यांचे कल्याण होईल, असा विश्वास हा पूर्ण बिहारमध्ये पसरला होता. आपल्या मुलाला अथवा मुलीला मुखर्जी नगरमध्ये पाठवताना, प्रत्येक आई-वडिलांच्या मनात एक उमेद, आशा असायची. काळजावर दगड ठेवून त्यांना लांब दोन-तीन वर्षे अभ्यासासाठी पाठवायचे. पण, हा दगड वेदना देणारा असला तरी तो मुलाच्या भविष्याची पायभरणीही करणारा होता. प्रशासकीय परीक्षेची तयारी करणार्या, मुलाला जेव्हा एखादा बाप स्थानकावर सोडायला जातो, तेव्हा त्याचा आविर्भाव असा असतो की, जणू तो ‘पीएसएलव्ही’ सॅटेलाईट सोडायला निघाला असावा. आनंद, उत्साह, भीती, शंका, शक्यता असे सर्व प्रकारचे भाव त्याच्या चेहर्यावर एकत्रितपणे दिसतात.
मुखर्जी नगरमधील माहोल हा एकदम निराळाच. कोण कोणाच्या व्यक्तिमत्त्वाची कशी पारख करेल सांगता येत नाही. इकडे तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर कोणता आहे, तुम्ही कोणती गाणी ऐकता, तुम्ही कोणत्या गाण्याच्या रिंगटोन ठेवता या सगळ्या गोष्टींवरून लोकं तुमच्या व्यक्तिमत्त्वाची पारख करतात. तसेच तुम्ही कोणता पेपर वाचता, कोणत्या दुकानातून पुस्तकं घेता, यावरसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पोस्टमार्टम होते.
या कथेत आपल्याला भेटतात-रायसाहेब, संतोष, मनोहर, गुरू, विमलेंदू, पायल, मयुराक्षी आणि विदिशा. या सगळ्यांमध्ये असलेले एकमेकांविषयीचे प्रेम, काळजी, परीक्षेची तारीख समजल्यावर प्रत्येकाची होणारी घालमेल आणि तेव्हा एकमेकांना दिलेला आधार, हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. नवीन विद्यार्थी आला की त्याला खोली शोधून देण्यापासून ते क्लासेस, जेवणाचे डबे, खोलीवर लागणारे सगळे सामान विकत घेईपर्यंतचा प्रवास आणि त्यातूनच एकमेकांच्या बाबतीत तयार झालेले मैत्रीचे अतूट नातं दिसून येतं. चार वेळा परीक्षा देऊनसुद्धा जेव्हा परीक्षा पास होत नाही, तेव्हा वातावरण हलके करण्यासाठी आणि आपल्या मित्राचा ताण कमी करण्यासाठी मारलेले डायलॉग हे आपल्याला पण हसवून तर जातातच; पण एक वेगळी ऊर्जासुद्धा देऊन जातात. जसे की ’जो जिता वो सिकंदर, जो हारा वो रूम के अंदर’ मुखर्जी नगरमधले विद्यार्थी पीटी (personality test)ची कशी तयारी करतात, परीक्षा दिल्या नंतर निकाल लागेपर्यंतचा काळ ते कसे घालवतात, याचे अतिशय उत्तम वर्णन नीलोत्पल मृणाल यांनी केले आहे.
लेखक हे स्वतः त्या परिस्थितीतून गेलेले असल्यामुळे, त्यातील वर्णन अधिकच जीवंत व वास्तववादी वाटतं. लेखकाचे हे पहिलेच पुस्तक असले, तरी ते आपल्याला खिळवून ठेवतं. प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्याला वाटेल, हे सर्व माझ्याशी निगडित असेच लिखाण आहे. खोली शोधताना ज्या गमती-जमती होतात, त्याचं वर्णन विनोदी पद्धतीने पण मार्मिकपणे दिसून येते. खोलीमधील अस्वच्छता, तिथली अस्ताव्यस्थता, बॅचलर मंडळींचा माहोल अचूक टिपला आहे. तसेच क्लासमध्ये काम करणारे चांगले शिक्षक हे प्रसिद्धीपासून कसे दूर असतात, त्यांना पैसा महत्त्वाचा नसून, मुलांना घडवणे त्यांना शिकवणे महत्त्वाचे असते. त्यांच्यात आत्मिश्वास निर्माण करणे, त्यांना जास्त महत्त्वाचे वाटते. अशा शिक्षकांबद्दल वाचलं की, अभिमान वाटतो. तसेच त्यांच्याबद्दल सहानुभूती पण वाटते. अशाच अनेक किस्स्यांनी भरलेले असे हे पुस्तक स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याआधी जरूर वाचावे.
लेखक : नीलोत्पल मृणाल
अनुवाद : डॉ. सतीश श्रीवास्तव
प्रकाशक : साकेत प्रकाशन
पृष्ठसंख्या : १८४
मूल्य : २०० रु
अमृता संभूस