राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला!

21 Dec 2023 16:18:04


JarJarangeange


जालना :
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून आता राज्य सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले आहे. मनोज जरांगेंकडे अधिक वेळेची मागणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ गेल्याचे सांगण्यात येत आहे.
 
ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री संदीपान भुमरे हे मनोज जरांगेंच्या भेटीकरिता अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत. राज्य सरकारकडून मनोज जरांगेंकडे वेळ वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. सरसकट आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांच्यात चर्चा सुरु आहे.
 
कुणबी नोंदी सापडलेल्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्यात येण्याची मागणी मनोज जरांगे यांनी शिष्ट मंडळाला केली आहे. तसेच आई ओबीसी असेल तर मुलालासुद्धा ओबीसी प्रमाणपत्र द्या, अशीही मागणी त्यांनी केली आहे. परंतू, आई ओबीसी असल्यास मुलाला ओबीसी प्रमाणपत्र देता येणार नसल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले आहे. दरम्यान, याबाबत चर्चा सुरु असून आता काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
येत्या फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून, मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. ते देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. मराठा समाजाला टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. त्यानंतर आता सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला गेले आहे.



Powered By Sangraha 9.0