दिल्ली मद्य घोटाळ्याचे मास्टरमाईंड केजरीवालच

21 Dec 2023 17:48:57
Bjp on Delhi Liquor Scam

नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालयनालयाच्या (ईडी) चौकशीस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी पुन्हा अनुपस्थित राहिले. त्यावर मद्य घोटाळ्याचे मास्टरमाईंड केजरावाल हेच असल्याचा टोला भाजपने लगावला आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, अरविंद केजरीवाल तपासापासून पळ काढत आहेत. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल २ नोव्हेंबरला पळून गेले होते आणि आजही पळून गेले. अरविंद केजरीवाल हे दिल्ली दारूकांडाचे सूत्रधार असून त्यांच्या सहभागाची चौकशी सुरू आहे. विरोधी पक्षांना जोडणारे फेविकॉल हिच दारू असून त्यामुळेच इंडिया आघाडीमध्ये घटकपक्ष एकत्र आले असल्याची टिका पात्रा यांनी केली.
 
केजरीवाल यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप पात्रा यांनी केला. ते पुढे म्हणाले, केजरीवाल तुरुंगवापापासून वाचण्यासाठी पळून जात आहेत. मनीष सिसोदिया यांचा जामीन फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार असल्याचे स्पष्ट म्हटले होते. केजरीवाल यांच्या प्रशासनामध्ये जनतेचे हित नव्हे तर स्वार्थास महत्त्व असल्याचेही पात्रा यांनी म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0