मुख्यमंत्र्यांचे 'ठाणे' म्हणजे चॅलेजिंग टास्क - पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची स्पष्टोक्ती

21 Dec 2023 18:30:36
Ashutosh Dumbre


ठाणे
: ठाणे हे विकासाचे शहर आहे. ठाणेकर समजूतदार आहेत. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने पुर्वीपेक्षा ठाणे बदलले आहे, किंबहुना, शहरात अनेक विकासकामे झाली आहेत.तेव्हा, ठाणे हे चॅलेंजिंग टास्क आहे. ठाणे शहराची भौगोलिक रचना पाहता अनेक आव्हाने आहेत अशी स्पष्टोक्ती गुरुवारी ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली. गुरुवारी नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मावळते पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडून पदभार स्वीकारला.
 
मुंबई पोलीस आयुक्तपदानंतर सर्वाधिक प्रतिष्ठेचे मानले जाणाऱ्या ठाणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार गुरुवारी आशुतोष डुंबरे यांनी स्वीकारताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. ठाणे पोलीस आयुक्तालयात यापूर्वी पोलीस उपायुक्त ते ठाणे सहपोलीस आयुक्त या पदावर काम केलेले असल्याने त्या अनुभवाचा फायदा आता होईल. असे स्पष्ट करून आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे एक चॅलेंजिंग टास्क असल्याचे सांगितले. आता ही जबाबदारी आम्ही स्विकारीत आहोत. ठाणे शहराची भोगोलिक रचना, सांस्कृतिक महत्व पाहिले असता अनेक आव्हाने आहेत, किंबहुना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असल्याने पूर्वीपेक्षा ठाणे बदलले असुन ठाण्यात ठिकठिकाणी खुप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे.

अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. ठाण्याचा विकास झाल्याने नागरीकरण वाढले, वाहने वाढल्याने वाहतुकीची समस्या आहे. त्यावर पर्यायी मार्ग काढता येणार आहे. वाढते सायबर गुन्हे, हिंसक गुन्हे, ड्रग्ज आदी समस्यांकडे गंभीरतेने लक्ष देण्यात येणार आहे. ठाण्यातील समस्या आणि गुन्हेगारी याबाबत प्रथम माहिती घेऊन नंतर त्यावर बोलेन, तत्पूर्वी दोन दिवस आढावा घेणार असुन त्यानंतरच यावर भाष्य करणार असल्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले. तर ठाण्यातील पोलीस वसाहत आणि पोलिसांची घरे याकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, मावळते पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी ठाण्याचा निरोप घेताना ठाणे पोलीस दलातील सर्व कनिष्ठ अधिकाऱ्यांशी हितगुज करीत हस्तांदोलन केले.






Powered By Sangraha 9.0