नागपूर : भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी विधानसभेत वर्धा जिल्ह्यातील लव्ह जिहाद प्रकरणाला वाचा फोडली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नसून मुलीच्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावर कारवाई करण्याची मागणीही राज्य सरकारकडे केली.
नितेश राणे म्हणाले की, "संपुर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखाच प्रकार वर्धा जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. तिथल्या अशफाक शाह नावाचा मुलगा एका मुलीला प्रेम प्रकरणात पळवून घेऊन गेला. त्या मुलीच्या आईने तक्रार केली असता पोलीसांनी याप्रकरणाची व्यवस्थित चौकशी केली नाही. त्यानंतर तिच्या आई वडीलांनी मुलीचा मोबाईल तपासला असता त्यांना काही धमकीचे मेसेज दिसले. याबद्दल मी स्वत: पोलीसांशी बोललो. तरीसुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही."
"याशिवाय मुख्यमंत्री आले तरी आम्ही या प्रकरणात लक्ष घालणार नाही असे पोलीसांनी मुलीच्या आई वडिलांना सांगितले. उद्या जर त्या मुलीला काही बरं वाईट झालं तर ते पोलीस जबाबदार असतील. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालून मुलीचं आयुष्य वाचवावं," अशी मागणी नितेश राणेंनी राज्य सरकारकडे केली.