हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; २६ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

20 Dec 2023 22:36:40
Maharashtra State Winter Session over

नागपूर :
गेल्या १४ दिवसांपासून नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर या काळात चाललेल्या या अधिवेशनात विरोधक पुरते अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. यापुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि. २६ फेब्रुवारी पासून मुंबईत होणार आहे.

अधिवेशन समाप्तीची घोषणा करताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे प्रत्यक्ष कामकाज १० दिवस (१०१ तास १० मिनिटे) चालले. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदाही ते तहकूब करावे लागले नाही. त्यामुळे सभागृहाचा वेळ वाया गेला नाही. हिवाळी अधिवेशनकाळात दिवसाचे सरासरी कामकाज १० तास ५ मिनिटे मिनिटे चालले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात २ हजार ४१४ लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या. त्यापैकी ३२७ स्वीकृत झाल्या. त्यातील ७० सूचनांवर चर्चा झाली. शिवाय ७ हजार ५१८ तारांकित सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी २४७ स्वीकृत, तर ३४उत्तरित झाल्या.

आमदारांच्या उपस्थितीवर नजर

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांची सर्वाधिक उपस्थिती ९३.३२ टक्के, तर सर्वात कमी उपस्थिती ६४.७१ टक्के इतकी होती. एकूण उपस्थितीचे सरासरी प्रमाण ८१.६९ टक्के इतके होते. यापुढचे अधिवेशन मुंबईमध्ये सोमवार, २६ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
Powered By Sangraha 9.0