"अशोक पर्व तर चमकलं पण..."; मुख्यमंत्री शिंदेंची चव्हाणांवर जहरी टीका

20 Dec 2023 16:37:43

Shinde & Chavhan


नागपूर :
आपल्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं पण मराठा पर्व मात्र आपण अंधारातच ठेवलं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे. मंगळवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य कराताना त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
 
विरोधी पक्षातर्फे मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "विरोधी पक्ष हा अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कदाचित महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते दिल्लीत लोकसभेच्या जागा वाटपात व्यग्र असल्याने त्यांना योग्य दिशा मिळाली नसेल. शिवाय दिशा सालियान प्रकरणात आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसलं. त्यामुळे अंतिम आठवडा प्रस्तावात आपण काय मागणी केली पाहिजे याचा विचारदेखील विरोधी पक्षांनी केला पाहिजे."
 
ते पुढे म्हणाले की, "आम्ही कारभार हाती घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात एफडीआयमध्ये मागे पडलेलं आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम केलं. मेट्रो, कारशेड, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, शिवडी एक्प्रेस, सी लिंक, मिसिंग लिंक, कोस्टल रोड या अनेक पायाभूत सुविधांचा यू टर्न बंद केला आणि त्याला फास्ट ट्रॅकवर आणलं. राजकारण करताना वस्तुस्थिती जाणून घेऊन आरोप केले पाहिजे. आरोपाला आरोप म्हणून विरोधी पक्षाने आरोप करता कामा नये. चांगल्याला चांगलं म्हणणं महाराष्ट्राची संस्कृती असून ते काम त्यांनी केलं पाहिजे."
 
"अशोक चव्हाण यांनी काल बाहेर जाऊन मराठ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात राजकारण आणले अशी टीका केली. खरंतर त्यावेळी मी अध्यक्ष होऊ नये यासाठी पडद्याआड प्रयत्न झाले. मी उपसमितीचा अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल, अशी भीती त्यावेळी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्र्यांना आणि अशोक चव्हाणांना होती. त्यामुळे जे काही साटंलोटं केलं ते झालं गेलं गंगेला मिळालं. पण अशोक चव्हाणांना मी एवढंच सांगतो की, तुमच्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं पण मराठा पर्व मात्र आपण अंधारातच ठेवलं," असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला आहे.



Powered By Sangraha 9.0