नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढण्यासाठी अपात्र घोषित केले आहे. कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी केली आहे. ज्या न्यायाधीशांनी हा निकाल दिला त्यांची नियुक्ती अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांच्या पक्ष डेमोक्रॅट्सने केली होती. ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिंसाचार झाला होता. या प्रकरणात ट्रम्प यांना हा दणका बसला आहे.
न्यायालयाच्या या निकालामुळे अपात्र ठरलेले ट्रम्प हे अमेरिकन इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. अमेरिकन राज्यघटनेच्या १४ व्या दुरुस्तीमधील कलम ३ प्रमाणे ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र ठरवण्यात आले. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालावर ४ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. या काळात ट्रम्प या निकालाला आव्हान देऊ शकतील.
काय म्हटलं आहे याचिकेत?
कोलोरॅडो येथील सहा मतदारांनी सप्टेंबरमध्ये हा खटला दाखल केला होता. त्यात ट्रम्प यांना २०२४ मध्ये होणाऱ्या राज्यातील मतदानपासून रोखण्याची विनंती करण्यात आली होती. राज्य घटनेतील दुरुस्तीचा त्यासाठी दाखला देण्यात आला होता. ज्या व्यक्तीने यापूर्वी सर्वोच्च पदाची शपथ घेतली आणि नंतर अमेरिकेच्या विरोधात बंड अथवा बंडखोरी केली असेल, अशा व्यक्तीला या घटनादुरुस्तीतील कलम ३ प्रमाणे प्रतिबंध घालण्याची तरतूद आहे. त्याचा दाखला याचिकाकर्त्यांनी दिला होता. अमेरिकेच्या राजधानीत दंगल घडविण्यात ट्रम्प यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होते, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.