मुंबई : २०२३ हे वर्ष बघता बघता सरत आले. या वर्षात अनेक हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट आले. हिंदी चित्रपटांच्या सोबतीने अनेक मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. 'वेड', 'बाईपण भारी देवा' या चित्रपटांनंतर आता 'झिम्मा २' हा चित्रपट हिंदी चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला झिम्मा २ विकी कौशल आणि रणबीर कपूरच्या 'सॅम बहादूर' आणि 'अॅनिमल' चित्रपटांचा सामना करत आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत होते. सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट सांगणारा 'झिम्मा २' दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवत आहे.
पहिल्या दिवशी 'झिम्मा २'ने १.२० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर तीनच दिवसांत या चित्रपटाने ४.७७ कोटींची कमाई केली होती. आता पहिल्या आठवड्यात 'झिम्मा २'ने बॉक्स ऑफिसवर एकूण ७.३८ कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच, हा चित्रपट परदेशात देखील प्रदर्शित होत आहे.