मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आल आहे. या बैठकीला आमदार राजू पाटील हेही उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून मराठी पाट्या लावण्याबाबत २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु अद्यापही अनेक ठिकाणी मराठी पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत. त्याविरोधात मनसेने अनेक ठिकाणी तोडफोडही केली आहे.
राज्यातील टोल नाक्यांच्या प्रश्नावरूनही यापुर्वी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर सरकारने टोलबाबत काही निर्णयसुद्धा घेतले होते. त्यातील काही त्रुटी व त्यासंदर्भातील अनेक मुद्द्यांवरुनही याप्रसंगी चर्चा करण्यात आलीय.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही ही भेट महत्वाची असल्याचं मानलं जातंय. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी च्या चिंतन सभेत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीत चार जागा लढवणार असल्याचं ही म्हटलं होतं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अधिकच महत्वपूर्ण ठरणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. कल्याण मध्ये श्रीकांत शिंदे व राजू पाटील एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत असे चित्र असते. पूर्वी आमदार राजू पाटील व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ट्विटर वॉर ही रंगले होते. ऑक्टोबर महिन्यात कल्याण ग्रामीणमधील मनसेच्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे राजू पाटील आणि श्रीकांत शिंदेंच्या वादात एकनाथ शिंदे हा मतदारसंघ सोडतील का असा ही प्रश्न निर्माण होत आहे.