वारसा सहल गिरगावची...

02 Dec 2023 20:30:10
Article on Cultual and Historical Girgaon

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहेच; पण संपूर्ण देशाची आर्थिक राजधानीसुद्धा. मुंबई म्हणजे बेटांचा समूह आणि पोर्तुगीजांकडून आंदणात मिळाल्यानंतर ब्रिटिशांनी ही मुंबानगरी वसवली. पण, या मुंबईत अगदी हाकेच्या अंतरावर अशा अनेक वास्तू आधुनिक इतिहासाची साक्ष देत आजही उभ्या आहेत. ‘भारतीय इतिहास संकलन समिती’ मुंबईचा इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा वारसा अभ्याससहलींचे आयोजन करत असते. ‘इतिहास संकलन समिती’चे सदस्य, अभ्यासक आणि लेखक मल्हार कृष्ण गोखले या वारसा सहलींमध्ये जुन्या-नव्या संदर्भांसह रंजक पद्धतीने मार्गदर्शन करतात. अशाच एका वारसा सहलीत नुकताच भटकंतीचा योग आला आणि गिरगावची पुन्हा नव्याने ओळख गवसली!

गावदेवीत वस्त्या असल्याने सुरुवात गावदेवीपासून करून केनेडी पूल-साकेत संघ कार्यालय-दोन हत्ती-मारवाडी विद्यालय-गिरगाव रोड-स्वामी समर्थ मठ कांदेवाडी या मार्गाने गोरा राम, काळा राम मंदिर, ठाकूरद्वारपर्यंत अनेक ऐतिहासिक वास्तू पाहत पदभ्रमण होतं. रविवारी अचानक आलेल्या पावसाने सफर पूर्ण झाली नाही तरीही अनेक ठिकाणं, जी माहितीतली आहेत, त्याबाबत नव्याने नक्कीच माहिती मिळाली. नाना चौकातील नाना शंकरशेटांच्या अर्धपुतळ्यापासून सफारीला आरंभ झाला.

नाना शंकरशेट चौक

पूर्वीच्या काळी आडनाव लावण्याची प्रथा नव्हती. वाडवडिलांपासून चालत आलेली परंपरा पुढे चालवताना, आपल्या नावामागे वडिलांचेच नाव लावण्याची पद्धत होती. मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणून सुपरिचित असलेले नाना यांचे मूळ आडनाव मुरकुटे. त्यांचा व्यवसाय होता व त्यानिमित्ताने ते गुजरातेत पोरबंदर येथे राहत. मुंबई जेव्हा ब्रिटिशांनी वसवायला घेतली, तेव्हा त्यांनी व्यावसायिकांना आवाहन केले आणि व्यापाराचे स्वातंत्र्य देऊ केले. तेव्हापासून मुंबई आर्थिकदृष्ट्या सबल होऊ लागली होती. त्यांच्या पेढीवर नेहमीच लक्ष्मीचा वरदहस्त होता. परंतु, त्या लक्ष्मीचा कृपणासारखा संचय त्यांनी केला नाही. जशी तिची ये-जा सतत होती, तशीच गरजूंची ये-जाही असायचीच. कुणीही विन्मुख होऊन त्यांची पायरी उतरले नाहीत. त्यांचे मंदिर या मार्गावर आहे. वाड्यापासून मंदिरापर्यंतच्या रस्त्यातल्या चौकट पुतळा आहे.

गावदेवी मंदिर व पूर्वाभिमुखी नर्मदेश्वराचे मंदिर

प्रत्येक गावाची जशी गावदेवी असते, तशी गिरगावचीसुद्धा आहे. गावदेवी मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. तसेच मंदिराच्या बाजूलाच रखमाबाई राऊत यांच्या आज़ोबांनी बांधलेले नर्मदेश्वराचेही मंदिर आहे. हे मात्र पूर्वाभिमुख. गावदेवीच्या मंदिरात शितळादेवीची घडवणुकीतली मूर्ती आहे. हे मंदिर ’आर्ट डेको’ पद्धतीने बांधण्यात आले आहे, तर नर्मदेश्वर मंदिरासमोर तलाव होता व त्याच्या चहूबाजूंनी चार दीपमाळा होत्या. त्या दीपमाळा आजही आहेत; पण तलाव मात्र कालौघात लुप्त झाल्याचे समजते.

आशियातील पहिली हाऊसिंग सोसायटी

‘हाऊसिंग सोसायटी’ ही संकल्पनाच जेव्हा अस्तित्वात नव्हती, त्यावेळी आशिया खंडात पहिली हाऊसिंग सोसायटी अस्तित्वात आली, ती होती सारस्वत ब्राह्मण ज्ञातीची. श्रीकांत तलगेरी यांच्या आजोबांनी यासाठी पुढाकार घेतला. आजही ते याच सोसायटीत राहतात.

गेटवे ऑफ इंडियाची नाकारलेली प्रतिकृती

गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम करण्यासाठी ब्रिटिशांनी स्केल मॉडेल्स मागवली होती. यशवंत देसाई यांनी त्यावेळी दोन स्केल मॉडेल्स बनवली होती. त्यातले एक निवडले गेले. ते राणीबागेत अजूनही आहे. मात्र, जे निवडले गेले नाही, असे दुसरे मॉडेल गावदेवीत त्यांच्या नातवाकडे सुरक्षित आहे.

तालीम स्टुडिओ

100हून अधिक काळ मार्बलमध्ये काम करणार्‍या कलाकारांचा हा स्टुडिओ. सध्या राजीव तालीम इथे पूर्णवेळ असतात. त्यांची ही तिसरी पिढी. आजवर अनेक ठिकांणी त्यांनी घडवलेल्या मूर्ती घेतल्या गेल्या आहेत. शिर्डी येथील साईबाबांची मूर्ती ज्या प्रतिकृतीवरून बनवली होती, ती मूर्ती या स्टुडिओमध्ये तयार झाली आहे. ती मूर्ती घडवताना या स्टुडिओमध्ये अनेक चमत्कारही झाले आहेत. साईबाबांनी आपले प्रकट दर्शन आपल्या आजोबांना दिले, असे राजीव सांगतात. त्यानंतर फ्लोरा फाऊंटनजवळील शिल्प तसेच मुंबईतील अनेक शिल्प त्यांनी बनवली आहेत. सध्या दिल्ली विमानतळासाठी उभ्या केल्या जाणार्‍या एका शिल्पावर ते काम करत आहेत.

साकेत संघ कार्यालय आणि नाझ थिएटर

साकेत कार्यालय म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुंबईतील पहिली शाखा. त्यासाठी गोपाळराव मुंबईला आले आणि एका चाळीत राहू लागले. संघाची शाखा सुरू व्हायला हवी, अशी सर्वांची इच्छा होती. मात्र, त्यासाठी वेळ कुणीच देऊ शकत नसे. गोपाळरावांनी डॉक्टरांना तसे कळवले. डॉक्टरांनी उलट टपाली कळवले, मुंबईत शाखा लावणे कठीण खरे. पण, प्रयत्न सोडू नका. ईश्वरी कार्य आहे. शाळेतल्या काही मस्तीखोर मुलांना घेऊन चाळीच्या व्हरांड्यात त्यांचे काही खेळ त्यांनी घेतले आणि मुंबईतली पहिली शाखा लागली. या कार्यालयात आजवरचे सर्व सरसंघचालक वास्तव्यास येऊन गेले आहेत. तेव्हा त्याचे नुकतेच नूतनीकरण केले व त्याचबरोबर नामकरणही केले. ’साकेत’ हे अयोध्या नगरीचे नाव. अयोध्येला वेगवेगळ्या काळात वेगवेगळी नावे होती. त्यातील साकेत हे नाव स्वीकारले गेले. येथेच एक राम फडके नावाचे स्वयंसेवक कोल्हापूरहून येऊन राहिले. त्यांनी अनेकांकडून पैसे घेतले व 200 रुपये जमवले. ते पैसे ते परत देऊ शकले नाहीत. तेव्हा ज्येष्ठ स्वयंसेवक नाईक यांनी चौकशी केली व राम यांना कार्यालयातून हद्दपार केले. सात दिवस विनाअन्नपाणी ते वणवण फिरत होते. माटुंग्याजवळील फाईव्ह गार्डन येथे त्यांना हुडून काढण्यासाठी त्यांचे सहकारी आल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितले की, ”नाईकांच्या निर्णयात मी दखल देत नाही. मात्र, तू संघ सोडू नकोस.” पेशाने गायक असेलेले हे फडके मग भारतभर फिरले, त्यांनी विविध संगीत जमवले आणि त्यानंतर सुधीर फडके म्हणून नावारुपास आले, अशी या कार्यालयाची महती. एकूणच काय तर मुंबईकर असूनही आपल्याच शहरातील अशा काही स्थळांची ऐतिहासिक माहिती अजिबात परिचयाची नसणार्‍यांसाठी ही सफर संस्मरणीय ठरावी, हे नक्की!
Powered By Sangraha 9.0