डोंगरीतील उपकरप्राप्त इमारत दुरुस्तीमधील व्यवहाराची चौकशी होणार – अतुल सावे

19 Dec 2023 14:48:34

mhada
 
नागपूर : मुंबईतील डोंगरी भागातील उपकरप्राप्त इमारत ६-६अ च्या दुरुस्तीचे काम न करता म्हाडाने बिले अदा केली असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंगळवार, दि. १९ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
 
या उपकरप्राप्त इमारतीची २०१८ मध्ये दुरुस्ती न करता म्हाडाने कामाची बिले अदा केल्याबाबत उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले, या दोन इमारतींच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. म्हाडाकडे निधी उपलब्ध आहे. रहिवाश्यांनी आर्किटेक्ट सुचवावा, त्याप्रमाणे दुरुस्तीचे काम केले जाईल. फातिमा मंझील इमारतीबाबतही वास्तुशास्त्रज्ञ सुचवून त्यानुसार काम केले जाईल. तसेच डोंगरी भागातील वार्डात मागच्या पाच वर्षात झालेल्या दुरुस्ती कामाचे अहवाल मागवले जाईल, असेही मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
 
यापूर्वीच म्हाडाला अर्थसंकल्पात ७९ कोटी रूपये, पावसाळी अधिवेशनात ९५ कोटी रूपये आणि हिवाळी अधिवेशनात ९८ कोटी रुपये निधी मिळाला आहे. विकास कामासाठी निधी कमी पडणार नाही. म्हाडातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. जाहिराती काढण्यात आल्या आहेत. लवकरच पदे भरले जातील, असे मंत्री सावे यांनी स्पष्ट केले.
 
 
Powered By Sangraha 9.0