लोकसभा सुरक्षाभंग प्रकरणाचे राजकारण करणे दुर्दैवी : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

18 Dec 2023 19:43:54
Loksabha Speaker Om Birla

नवी दिल्ली  : 
लोकसभा सुरक्षाभंगाचे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मात्र, काही राजकीय पक्षांकडून या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न अतिशय दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले आहे.

लोकसभा सुरक्षाभंग प्रकरणाचे पडसाद लोकसभेत सोमवारीदेखील उमटले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावे, अशी मागणी करून गदारोळ केला. यावेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी फलकबाजीदेखील केली. या प्रकाराबद्दल लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, लोकसभा सुरक्षाभंगाचे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकाराची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याचप्रमाणे संसदेची सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीमध्ये देण्यात आलेल्या काही सुचनांवर अंमलबजावणी झाली असून उर्वरित सुचनांवरही कार्यवाही होणार असल्याचे बिर्ला म्हणाले.

सुरक्षाभंग प्रकरणाचे काही पक्षांकडून होणारे राजकारण दुर्दैवी असल्याचे बिर्ला यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, यापूर्वीदेखील संसदेत पिस्तुल घेऊन येण्यासह रंगीत स्प्रे फवारण्याच्या प्रयत्नांच्या घटना घडल्या आहेत. त्यावेळीदेखील सचिवालयानेच त्यावर कार्यवाही करून लोकसभा अध्यक्षांनी त्यावर कारवाई केली होती. त्याचप्रमाणे खासदारांच्या निलंबनाचे कारण सुरक्षभंग प्रकरणी प्रश्न विचारणे हे नसून लोकसभेच्या कामकाजात अडथळा आणणे हे असल्याचेही बिर्ला यांनी नमूद केले आहे.
 
लोकसभेतून ३३ तर राज्यसभेतून ३४ खासदारांचे निलंबन

राज्यसभा आणि लोकसभेतील एकूण ६७ विरोधी पक्षांच्या खासदारांना आज निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेतील गदारोळावर कडक कारवाई करत अध्यक्षांनी यांनी 33 खासदारांना निलंबित केले तर राज्यसभेत सभापतींनी 34 खासदारांना निलंबित केले. लोकसभेत विरोधी खासदारांचे फलक दाखविल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतील निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांचाही समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे जयराम रमेश यांनाही राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजाच्या दिवसांसाठी सर्व खासदारांना निलंबित केले आहे.
Powered By Sangraha 9.0