सलीम कुत्ता प्रकरणी गिरीष महाजनांचा खडसेंवर घणाघात; म्हणाले, "त्यांच्या डोक्यात बिघाड..."

18 Dec 2023 17:40:57

Girish Mahajan


नागपूर :
एकनाथ खडसेंवर बिकट वेळ आल्याने त्यांच्या डोक्यात मानसिकदृष्ट्या बिघाड झालेला आहे. त्यामुळे ते उठता बसता वाटेल ते बेछूट आरोप करत आहेत, असा घणाघात मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे. सोमवारी सलीम कुत्ता प्रकरणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
गिरीष महाजन म्हणाले की, "एकनाथ खडसे यांची मानसिक स्थिती बिघडलेली दिसत आहे. उठता बसता वाटेल तसे बेछूट आरोप करण्यासाठी त्यांना मीच दिसतोय. नाशिकचा विषय हा गेल्या ९ वर्षांपुर्वीचा आहे. त्यावेळी तिथे कुंभमेळा झाला. त्यानंतर तेथील मुस्लीम धर्माच्या सर्वात मोठ्या धर्मगुरुंच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं. त्या लग्नाला जवळपास २० ते २५ हजार जण उपस्थित होते. यावेळी सगळे अधिकारी, पदाधिकारी, सगळ्या पक्षांचे आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर लग्नाला उपस्थित होते."
 
"त्यावेळी त्या फोटोवरून मुलीचे दुरचे नातेवाईक हे दाऊदशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हाच आम्ही याप्रकरणाची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांचा दाऊदशी काहीही संबंध नसल्याचा लेखी अहवाल आला होता. परंतू, आता एकनाथ खडसे महाशयांच्या पोटात दुखतंय. त्यांच्यावर महसूल चोरल्याने १३७ कोटी रुपये आणि भोसरी एमआयडीसी प्रकरणात २७ कोटी रुपये दंड झाला आहे. पायात चप्पलही घालायलाही पैसे राहणार नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे ते बावचळले आहेत. म्हणून असे जुने आरोप शोधून काढण्यात येत आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "खडसेंचा पार सत्यानाश झालेला आहे. त्यांचं कुठलही राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही आणि आर्थिकदृष्ट्या ते बुडाले आहेत. त्यांच्यावर बिकट वेळ आल्याने त्यांच्या डोक्यात मानसिकदृष्ट्या बिघाड झालेला आहे. यातूनच ते दररोज असे आरोप करत आहेत. शिवसेनेची अवस्था घर के ना घाट के अशी झालेली आहे. त्यामुळे ते असे बेछूट आरोप करत आहेत," असेही ते म्हणाले आहेत.





Powered By Sangraha 9.0