करोडो रामभक्तांचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी साकार केले : मुख्यमंत्री शिंदे

17 Dec 2023 19:30:25
CM Eknath Shinde on Shri Ram Mandir

ठाणे :
अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न होते. अशा देशातील करोडो रामभक्तांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साकार केले आहे.अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी विश्वहिंदू परिषदेच्या माध्यमातुन घरोघरी अक्षता पोहचवण्याचे काम करण्यात येत आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

दरम्यान, गडकरी रंगायतन ते कौपिनेश्वर मंदिर या मार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रेला प्रारंभ झाला. त्यावेळी माध्यमांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. या यात्रेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह आ. प्रताप सरनाईक, आ. निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के तसेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटासह विश्वहिंदु परिषदेचे पदाधिकारी जय श्रीराम च्या जयघोषात मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.

सुमारे ५०० वर्षानंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभारण्यात येत असून त्याचा उद्घाटन समारंभ २२ जाने.२०२४ रोजी मोठ्या जल्लोषात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रंसगी श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने प्रत्येक घराघरात अक्षता रवाना करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी गडकरी रंगायतन येथुन श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रेला प्रारंभ झाला.

यावेळी सजवलेल्या पालखीतुन श्रीरामाच्या प्रतिमेसह शोभा यात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या पालखीचे भोई बनले होते.टाळ मृदुंगाच्या गजरात ढोल ताशे आणि लेझीमच्या तालावर निघालेल्या या शोभा यात्रेत ठाणेकरांसह अनेक साधुसंत तसेच सर्वधर्मीय नागरीक सहभागी झाले होते. यावेळी भाविकांनी जयश्रीराम च्या घोषणा देऊन परिसर दणाणुन सोडला. प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात पालखी पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कौपिनेश्वराला दुग्धाभिषेक करून दर्शन घेतले.
Powered By Sangraha 9.0