उपेंद्र लिमये : मराठीतला रांगडा नट

    16-Dec-2023
Total Views |
Upendra Limaye interview


मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील राजीव पाटील, अमोल पालेकर, मधुर भांडारकर, जब्बार पटेल, विनय आपटे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी अशा मातब्बर दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला मराठीतला एक रांगडा कलाकार म्हणजे उपेंद्र लिमये. 2023च्या अखेरीस ‘बॉक्स ऑफिस’वर आपले यशस्वी खाते उघडणार्‍या, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील विशेष भूमिका साकारणार्‍या उपेंद्र लिमयेशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद...


...आणि ‘अ‍ॅनिमल’मधील फ्रेडी पाटील प्रेक्षकांना मिळाला!

दाक्षिणात्य दिग्दर्शकांनाही हल्ली इतर भाषिक कलाकारांची भुरळ पडलेली दिसते. पण, विशेषकरून हिंदीतील एका मोठ्या कलाकारासमोर मराठी कलाकाराने विशेष भूमिका साकारावी, असा हट्ट करणार्‍या दिग्दर्शकाची पसंती जर का उपेंद्र लिमये असेल, तर नक्कीच त्या हट्टात तथ्य आहे. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ‘अ‍ॅनिमल’मधील रणबीर कपूर सोबत असणारा, फ्रेडी पाटील हा उपेंद्र लिमयेनेच साकारावा, असा हट्ट केला होता. याबद्दल स्वतः उपेंद्र म्हणाले की, “ ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट बघून, मी त्यांच्या प्रेमात पडलो होतो. पण, काम तसं काही एकत्रितपणे करण्याचा योग आला नाही. काही महिन्यांनंतर मला संदीप यांच्याकडून जितेंद्र भोसले यांनी फोन केला आणि रणबीरच्या एका चित्रपटात तू एक विशेष भूमिका साकारावी, असा प्रस्ताव मांडत, वांगा यांची इच्छा व्यक्त केली. पण, केवळ एका लहानशा भूमिकेसाठी मी तयार नसल्याने, थेट नकारच कळवला. मात्र, संदीप यांनी मला भेटायला बोलावून, माझ्या भूमिकेबद्दल सविस्तरपणे माहिती दिली. त्यावेळी मला लक्षात आलं की, विशेष भूमिका म्हणून खरंच करायला हरकत नाही आणि मला आव्हानात्मक भूमिका वाटल्याने ती स्वीकारली. ज्यावेळी या भूमिकेसाठी केशभूषा, वेशभूषा तयार केली जात होती, तेव्हा मी आणखी एका चित्रपटासाठी माझा नवा लूक तयार केला होता. त्यामुळे मी तो बदलणार नसल्याचे ठामपणे सांगितले आणि दिग्दर्शकांनी माझ्या आवडीनुसार आता तुम्हाला दिसणारा फ्रेडी पाटील तयार केला. सरतेशवेटी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातला फ्रेडी पाटील प्रेक्षकांच्या स्वाधीन केला,“ असे म्हणत जगभरात यश मिळवणार्‍या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग झाल्याचा आनंद असल्याचेही उपेंद्र यांनी म्हटले.
 
 
कलाकाराने आपले गुण-दोष ओळखावे

“एक माणूस आणि नट म्हणून स्वतःला ओळखणे फार महत्त्वाचे आहे,” असे म्हणत उपेंद्र लिमये यांनी म्हटले की, ”प्रत्येक कलाकाराला त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते आणि अभिनय करत असताना, मला एक गोष्ट प्रकर्षाने समजली, ती म्हणजे माझं अस्तित्व काय आहे? माझा आवाज कसा आहे? माझ्या व्यक्तिमत्त्वाचे गुण-दोष काय आहेत? याची मला जाणीव झाली, तर मी एक परिपूर्ण कलाकृती प्रेक्षकांसमोर मांडू शकतो, याचा मला विश्वास आहे. त्यामुळे मी कधीच ठरवून ठरावीक भूमिका केल्या नाहीत. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, मला दिग्दर्शकांनी पूर्णपणे मला हवा तसा फ्रेडी पाटील साकारण्याची मुभा दिली. म्हणजे राग आल्यानंतर तो मराठी माणूस कसा व्यक्त होईल, ‘चांगभलं’ सारखा शब्द किती प्रभावशाली वाटेल, अशा बर्‍याच लहानसहान गोष्टींचा विचार करून या चित्रपटात मराठीचा तडका दिला आहे,“ असे म्हणत स्वतःला पारखून चोख भूमिका साकाराव्या, असा सल्लादेखील उपेंद्र नवोदित कलाकारांना देतो.

मी कधीच कुणाकडे काम मागितले नाही!

चित्रपटातला नट उंच, गोरा पान, देखणा असावा, अशा दिग्दर्शकांच्या अपेक्षा. मात्र, केवळ ताकदीच्या अभिनयाची पुंजी गाठीशी बांधून, स्वतःला सिद्ध करणार्‍या, उपेंद्र यांनी कधीच कुणाकडे काम मागितले नसल्याची सांगितले. “मला कोणत्याही भूमिकेसाठी नकार मिळाला नाही, याचे कारण असे की, मी कधीच कुणाकडे काम मागायला गेलो नाही. माझा पहिला चित्रपट होता-दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा ’मुक्ता.’ तिथपासून सुरू झालेला माझा चित्रपटांचा प्रवास अविरतपणे अजूनही चालूच आहे, ज्यात मला विविधांगी भूमिका मिळत आहेत. गेल्या 30 वर्षांच्या माझ्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दित मी निभावलेले प्रत्येक पात्र मला त्या-त्या दिग्दर्शकांनी माझ्या अभिनय क्षमतेवर विश्वास ठेवून, मला त्या भूमिका देऊ केल्या आहेत. ’जोगवा,’ ‘मुळशी पॅटर्न,’ ‘पेज 3’, ‘सरकार राज,’ ‘ट्रॅफिक सिग्नल’ अशा अनेक भूमिका या विभिन्न असून, मला माझ्या अभिनयाच्या अनुभवावरून साकारता आल्या, याचा आनंद आहे. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, मी जोपर्यंत काम करत राहणार आहे, तोपर्यंत मी अधिक उत्तम नट होण्याच्या प्रयत्नात आणि शोधात असणार आहे.”

काळानुरूप चित्रपटांच्या व्याख्या बदलल्या...

मनोरंजनसृष्टीच्या इतिहासात डोकावून पाहिले, तर समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट या दोन विभिन्न संकल्पना होत्या, हे निदर्शनास येते. मात्र, माणसांच्या विचारांनुसार, अपेक्षेनुसार मनोरंजन आणि चित्रपटांच्या व्याख्या बदलल्याचे सांगत उपेंद्र लिमये यांनी चित्रपटांबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. “30 वर्षांच्या माझ्या मनोरंजनसृष्टीतील कारकिर्दीकडे मागे वळून पाहताना हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाल्याचे अनुभवले आहे. सुरुवातीची आठ ते दहा वर्षं मी केवळ प्रायोगिक चित्रपटांचाच भाग होतो. समांतर चित्रपटांत बरीच वर्षं काम केल्यानंतर, ’चांदनी बार’ हा माझा पहिला व्यावसायिक चित्रपट होता. परंतु, पूर्वी समांतर चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट या दोन स्वतंत्र संकल्पना होत्या. काळानुरूप यात बदल होत गेला. समांतर आणि व्यावसायिक चित्रपटांच्या व्याख्यादेखील बदलत गेल्या,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

निळू फुलेंचे ‘ते’ कौतुकाचे शब्द हुरूप देतात!

“मराठीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार आणि माझे स्वतःचे आवडीचे कलाकार म्हणजे निळू फुले. त्यांनी ’पेज 3’ चित्रपट पाहिल्यानंतर, मोबाईल फोन नसल्याकारणाने मला लॅण्डलाईवर फोन केला होता आणि माझ्या कामाचे त्यांनी प्रचंड कौतुक केले होते. त्यानंतर सुहास जोशी ताईंनी देखील आम्ही एकत्र मालिका करायचो, त्यावेळी असा विश्वास होता की, उप्या, तुझं फार बरं होणार आहे, या म्हातारीला लक्षात ठेव. अशा दिग्गज कलाकारांच्या कौतुकामुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी या क्षेत्रात आपले योगदान देऊ शकलो,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या ज्येष्ठ कलाकारांचे आभार मानले.


- रसिका शिंदे - पॉल