विधानपरिषदेत लोकायुक्त विधेयक एकमताने मंजूर! मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत येणार
16 Dec 2023 13:51:09
नागपूर : केंद्र सरकारच्या कायद्याच्या धर्तीवर सुधारणा करणारे लोकायुक्त विधेयक शुक्रवारी विधानपरिषदेत एकमताने मंजुर करण्यात आले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतूदी आता लोकायुक्त कायद्यांतर्गत आणल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
लोकायुक्त कायद्यांतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतूदी आणल्या आहेत. याशिवाय मुख्यमंत्र्यांसह सर्वांनाच लोकायुक्त कायद्याच्या अख्त्यारित आणले आहे. तसेच लोकांयुक्तांना निवडण्याची समिती पारदर्शी केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते, सभापती, अध्यक्ष आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश आहेत.
या कायद्यानुसार, लोकायुक्तांकडे एखाद्या आमदाराच्या विरुद्ध तक्रार आल्यास आधी ते त्याची चौकशी करतील. त्यानंतर यात काही तथ्य आढळल्यास संबंधित सभागृहाच्या सभापतींची परवानगी घेऊन अंतिम तपास करावा लागेल. यासंबंधी खटला चालवायचा असल्यास पुन्हा एकदा परवानगी घ्यावी लागेल.
त्याचप्रमाणे मंत्र्यांच्या संदर्भात तक्रार आल्यास राज्यापालांची परवानगी घ्यावी लागेल. तसेच मुख्यमंत्र्यांविरुद्ध चौकशी करायची असल्यास सभागृहाची परवानगी घ्यावी लागेल. याशिवाय तक्रार खोटी आढळल्यास तक्रार करणाऱ्यावर कारवाई करण्याची तरतूददेखील या कायद्यात करण्यात आली आहे. अण्णा हजारेंनी या कायद्याला मान्यता दिली आहे.