आरक्षणाविषयी प्रसाद लाड यांचं मोठं विधान, म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर..."

16 Dec 2023 11:14:02

Prasad Lad


नागपूर :
जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर मी माझ्या पुढच्या पिढीसाठी ते सोडून देतो, असे विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देताना ६० वर्षात जे मराठा समाजाचे मुख्यमंत्री करु शकले नाहीत, ते काम २०१८ साली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केलं, असेही ते म्हणाले. शुक्रवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ते सभागृहात बोलत होते.

 
प्रसाद लाड म्हणाले की, "मराठा समाजाला ११ मुख्यमंत्री मिळालेत. ते ११ मुख्यमंत्री ६० वर्षात जे करु शकले नाहीत ते २०१८ मध्ये मराठा समाजाचे नसूनही एका ब्राम्हण समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झगडले आणि आरक्षण दिलं. परंतू, या झगडणाऱ्या मुख्यमंत्र्यांविषयी जर तु येऊनच दाखव, तुला मी संरक्षण देतो, तु कसा फिरतो ते बघतो ही भाषा वापरली जात असेल तर सभागृहातला एक सदस्य म्हणून ते मी सहन करणार नाही.
"
"जे जनतेतून निवडून आलेत त्यांचा अपमान करायचा आणि म्हणायचं की, आम्ही आमच्या लेकरांसाठी करतो. पण लेकरांसाठी करताना राजकीय ढेकरा द्यायच्या, हा धंदा व्हायला नको," असेही ते म्हणाले आहेत. तसेच जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं, तर एक मराठा म्हणून मी माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी आरक्षण सोडून देतो, असे विधानही त्यांनी केले.
 
ते म्हणाले की, "४ कोटी जनतेमधील ५० लाख लोक श्रीमंत असतील आणि त्यापैकी १० लाख लोकं अतिश्रीमंत असतील तर त्यांनी स्वत:हून आरक्षण सोडून दिलं पाहिजे. मी स्वत: आज सभागृहात जाहीर करतो की, जर समाजाला आरक्षण मिळालं तर मी माझ्या पुढच्या पिढीसाठी ते सोडून देतो. माझ्यासारखी भुमिका जर मराठा समाजाच्या प्रत्येक नेत्याने घेतली तर उरलेल्या साडेतीन कोटी जनतेला त्याचा निश्चितच फायदा होईल."


 
Powered By Sangraha 9.0