महेश लांडगेंचे मराठा आरक्षणावर प्रखर भाषण! म्हणाले, "त्यांच्यात कुवत होती तर..."

16 Dec 2023 16:32:09

Mahesh Landge


नागपूर :
नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून शुक्रवारी भाजप आमदार महेश लांडगे यांनी मराठा आरक्षणावर सभागृह गाजवला. यावेळी त्यांनी विरोधकांनाही धारेवर धरले. ज्यांनी ५०-६० वर्षे राज्य केलं यांनी काय केलं. जर त्यांच्यात कुवत होती तर आरक्षणाचा मुद्दा आमच्यापर्यंत का आला? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
 
महेश लांडगे म्हणाले की, "ज्यावेळी मनोज जरांगेंनी आंदोलनाला सुरुवात केली त्यानंतर काही दिवसांत त्याला वेगळे वळण मिळाले. ओबीसी आणि मराठा असे वातावरण तयार करण्यात आले. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही बरेच आरोप झाले. पण ओबीसींच्या नेत्यांना आणि मराठा समाजाच्या नेत्यांना माझं एकच म्हणणं आहे की, देवेंद्रजींचं किंवा भाजप नेत्यांचं असं एकतरी वाक्य दाखवा ज्यात त्यांनी म्हटले आहे की, ओबीसींचं आरक्षण कमी करुन मराठ्यांना आरक्षण देणार."
 
"मात्र, हा संभ्रम निर्माण करणारी एक टीम महाराष्ट्रात कार्यरत आहे त्यापासून सावध राहायला हवं. महाराष्ट्रात कुठल्याही गोष्टीचं राजकारण करण्याची प्रथा सुरु झाली आहे. पण ज्यांनी ५०-६० वर्षे राज्य केलं त्यावेळी यांनी काय केलं. जर त्यांच्यात कुवत होती तर आरक्षणाचा मुद्दा आमच्यापर्यंत का आला. यातील काही लोकं असे आहेत जे एकीकडे ओबीसींच्या मंचावरही जातात आणि दुसरीकडे मराठ्यांच्या मंचावरही बोलतात," असेही ते म्हणाले.
 
लव्ह जिहादवर काम करत असताना आम्ही ती मराठा समाजाची मुलगी आहे म्हणून तिला वाचवत नाही तर माझ्या घरातली बहिण आहे म्हणून वाचवतो. मराठा समाजाच्या माणसाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे. मराठा समाजातील लोकांना लगेच सरकारी नोकरी मिळत नाही. शंभर पैकी केवळ दोन जागा मराठा समाजासाठी असतात. वर्ग ३ आणि वर्ग ४ मध्ये काम करणाऱ्या मराठा लोकांची अनुकंपा पद्धती बंद केली. या सगळ्या प्रश्नांसाठी मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, असेही ते म्हणाले.



Powered By Sangraha 9.0