मुंबई : अयोध्येत रामलला विराजमान होणार असल्याच्या निमित्ताने दि. सोमवार, २२ जानेवारी २०२३ राज्य सरकारतर्फे सार्वजनिक सुटी जाहीर करावी अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्याना पत्र दिले आहे.
अयोध्येत रामलला विराजमान होणार असल्याच्या निमित्ताने देशभर उत्साहाचे वातावरण असणार आहे. देशभर दिवाळी साजरी केली जाणार असल्याचे संकेत यापूर्वीच केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी दिले आहेत. देशभरातील प्रत्येक राम मंदिरात उत्सव साजरा केला जाणार आहे.
या दिवशी सोमवार दि. २२ जानेवारी रोजी कार्यालयीन दिवस असल्याने अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. राम मंदिरात रामलला विराजमान होण्याचा हा ऐतिहासिक दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला साजरा करता यावा यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भातील पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे. सरकारने या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कुणाकुणाला होणार निर्णयाचा फायदा!
महापालिका, राज्य सरकारी कर्मचारी, निमशासकीय संस्था तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.