मुंबई : प्रेक्षकांनी गेल्या काही काळात चित्रपटगृहांपेक्षा अधिक पसंती ओटीटी वाहिन्यांना दिली आहे. त्यातही नेटफ्लिक्स या ओटीटीवर जगभरातील विविध प्रकारचा आशय अनेक भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे प्रेक्षकांचा कल नेटफ्लिक्सकडे अधिक दिसून येतो. अशात आता नेटफ्लिक्सने आपल्या यूझर्सच्या वापराचा डेटा आणि सर्वाधिक पाहिलेले चित्रपट आणि वेब मालिका कोणत्या आहेत याची यादी जाहिर केली आहे. अभिमानाची बाब म्हणजे यात भारतीय चित्रपट आणि मालिकांचा समावेश आहे.
‘व्हाट वी वॉच्ड ए नेटफ्लिक्स एंगेजमेंट रिपोर्ट’च्या आधारे नेटफ्लिक्सने जानेवारी २०२३ ते जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आणि वेब मालिकांची पाहिली गेलेली यादी जाहिर केली आहे. या यादीत भारतीय मालिका ‘राणा नायडू’चा समावेश असून ही वेब मालिका जवळपास ४,६३,००,००० तास पाहिली गेली आहे.
नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पहिल्या जाणाऱ्या १००० चित्रपट आणि वेबसीरिजच्या यादीत ९ भारतीय कलाकृतींचादेखील समावेश आहे. यात ‘मिशन मजनू’, ‘इंडियन मॅचमॅकिंग’, ‘चोर निकल के भागा’, ‘आरआरआर’, ‘तू झुठी मै मक्कार’, ‘शहजादा’, ‘द नाइट एजंट’, ‘क्लास’, ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ इत्यादी मालिका आणि चित्रपटांचा समावेश आहे.