नागपूर : मराठा समाजाला आरक्षण न देण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा आरोप भाजप आमदार हरीभाऊ बागडे यांनी केला आहे. तसेच लोकांची गरिबी ही काँग्रेस-राष्ट्रवादीची वोट बँक आहे, असा घणाघातही त्यांनी केला. गुरुवारी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ते बोलत होते.
हरीभाऊ बागडे म्हणाले की, "गेल्या तीन-चार महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. अधिवेशनामध्ये हा विषय पहिल्यांदाच आला आहे. आजवर बाहेर चर्चा झाली पण विधानसभेच्या सभागृहात विरोधी पक्षांच्या आमदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पहिल्यांदा आणला आहे. आज राज्यभरात मराठा, धनगर समाजाचे आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाची आरक्षण मागण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा ही मागणी करण्यात आली आहे."
पुढे ते म्हणाले की, "पुर्वी मराठा समाजाला आरक्षण होतं. १९०२ साली छत्रपती शाहू महाराजांनी हे आरक्षण दिलं होतं. तसेच १९४२ साली जर मराठा समाजाला आरक्षण होतं तर १९६२ साली पुन्हा काढलेल्या परिपत्रकातून मराठा समाजाचं नाव गायब का केलं गेलं? त्यावेळी कुणाचं सरकार होतं?" असा सवाल त्यांनी केला.
"तसेच १९६२ मध्ये मराठा समाजाचं नाव यादीतून काढण्याची जबाबदारी त्यावेळेच्या राज्य सरकारची आहे. त्यानंतर कुणबी-मराठा, मराठा-कुणबी असा घोळ घातला गेला. त्यावेळी आंदोलन होऊनही मराठा आरक्षणावर बोललं नाही परंतू आता म्हणतात आरक्षण द्या. याशिवाय आता मराठा आरक्षण न देण्याचे कारण देवेंद्र फडणवीस असल्याचे वातावरण सगळीकडे निर्माण केलं जातंय."
"परंतू, मराठा आरक्षण न देण्याला जबाबदार कोणी असेल तर त्यावेळेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले जबाबदार आहेत. कारण लोकांची गरिबी ही काँग्रेस-राष्ट्रवादीची वोट बँक आहे. म्हणून त्यांना आरक्षण द्यायचं नाहीये. त्यांनी ओबीसींना १० वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवलं. लोकं गरीब राहावे अशी तुमची मानसिकता होती." असेही ते म्हणाले आहेत.