लोकसभा आणि राज्यसभेतून १५ खासदार निलंबित

14 Dec 2023 18:06:44
15 Opposition MPs Suspended From Parliament For Disrupting House Proceedings


नवी दिल्ली
: लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणावरून गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांनी गदारोळ केला. त्यानंतर लोकसभेच्या १४ आणि राज्यसभेच्या एका खासदाराचे निलंबन करण्यात आले आहे.लोकसभेत बुधवारी झालेल्या सुरक्षाभंगाच्या प्रकरणाचे पडसाद गुरूवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. याप्रकरणी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. गदारोळप्रकरणी काँग्रेस आणि अन्य पक्षाच्या सदस्यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. त्यामध्ये काँग्रेस सदस्य टी. एन. प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोस, बेनी बेहानन, मोहम्मद जावेद, व्हीके श्रीकंदन, मणिकम टागोर, माकपचे पीआर नटराजन आणि एस. व्यंकटेशन, द्रमुकच्या कनिमोझी आणि एस. आर. पार्थिव यांचा समावेश आहे.

राज्यसभेतही विरोधी पक्षांनी लोकसभा सुरक्षा भंगप्रकरणी गदारोळ केला. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.लोकसभेत केंद्रीय संरक्षण मंत्र राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांच्या गदारोळास उत्तर दिले. ते म्हणाले, बुधवारी संसदेत घडलेली घटना दुर्दैवी आहे. सर्वांनी त्याचा निषेध केला आहे. आपणही याची तात्काळ दखल घेत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यात सर्व खासदारांनी सावध राहावे. संसदेमध्ये प्रवेशासाठीचे शिफारसपत्र देताना काळजी घेण्याची गरज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांना आहे. जुन्या संसद भवनातही अशा घटना घडल्या आहेत. सर्वांनी मिळून या घटनेचा निषेध केला पाहिजे. या मुद्द्यावरून संसदेत अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.



Powered By Sangraha 9.0