रक्ताचा अपव्यय टाळण्यासाठी शासनाच्या सर्व रक्तपेढ्यांमध्ये ‘अँलिकॉट’ बसवणार

13 Dec 2023 12:56:54
tanaji swant 
 
नागपूर : रक्ताचा अपव्यय टाळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील ३१ शासकीय रक्तकेंद्रामध्ये ‘अँलिकाँट’ मशीन बसविण्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवार, दि. १३ डिसेंबर रोजी विधानसभेत केली. येत्या महिनाभरात यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
रक्ताशी संबंधित विविध प्रकारचे आजार असलेल्या लहान मुलांमध्ये प्रौढ रुग्णांइतकी रक्ताची गरज लागत नाही. त्यामुळे रक्त वाया जाऊ नये, यासाठी रक्तपेढयांमध्ये अँलिकॉट मशीन (रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे यंत्र) उपलब्ध असणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३१ रक्तपेढयांपैकी केवळ ८ रक्तपेढ्यांमध्ये, तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १४ रुग्णालयांपैकी केवळ ३ ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या मशीन तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली.
 
त्यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, अँलिकॉट मशीन हे लहान यंत्र असून रक्ताची ३५० मि.ली.ची पूर्ण बॅग गरजेप्रमाणे विभाजन करून बालरुग्णांना अचूक तेवढेच रक्त देण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो. यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. सध्या कार्यरत असलेले रक्तकेंद्र तंत्रज्ञसुद्धा ही मशीन वापरु शकतात. येत्या महिनाभरात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील सर्व ३१ शासकीय रक्तकेंद्रामध्ये अँलिकाँट मशीन उपलब्ध करून दिल्या जातील. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि खासगी रक्तपेढ्यांनाही त्यासंदर्भात सूचना देण्यात येतील, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0