रोहित पवार हा बिनडोक माणूस, त्याचा अन् संघर्षाचा काय संबंध?, गोपीचंद पडळकरांचा घणाघात

13 Dec 2023 13:51:46
 
Rohit Pawar & Padalkar
नागपूर : रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. त्याला ज्याने सल्ला दिला असेल ते बेअक्कल आहेत, असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जबद्दल ते माध्यमांशी बोलत होते.
 
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. त्यांना ज्याने सल्ला दिला असेल ते बेअक्कल माणसं आहेत. संघर्षाचा आणि रोहित पवारांचा संबंध काय? सोन्याच्या बाळोत्यात जन्मलेल्या रोहित पवारांनी संघर्ष कधी बघितला?" असा सवाल त्यांनी केला आहे.
 
"मुळात त्यांची संघर्ष यात्रा ही सपशेल अपयशी झाल्यामुळे त्यांना राज्यभर कुठेच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मग सरतेशेवटी चर्चेत येण्यासाठी पोलिसांशी वाद करायचा आणि म्हणायचं सरकारने पोलिस बळाचा वापर केला. त्यांची ही यात्रा पुर्णपणे अपयशी झाल्यामुळे काहीतरी स्टंट करायचा म्हणून त्यांनी हा प्रकार केला आहे. याकडे महाराष्ट्रातील लोक गंभीरतेने बघत नाहीत," असेही ते म्हणाले आहेत.
 
मंगळवार, १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत नागपुरात युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा विधानभवनाकडे वळवला होता. दरम्यान, पोलिसांनी ही यात्रा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक भुमिका घेत बॅरिकेट्स तोडून विधानभवनात जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांकडून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला होता.



Powered By Sangraha 9.0