नागपूर : लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी सभागृहात उडी टाकून घातलेल्या गोंधळाचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळातही उमटले. महाराष्ट्र विधिमंडळात गॅलरी पास बंद करण्यात आले असून, आमदारांना केवळ दोनच पास वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन जणांनी सभागृहात उडी मारली आणि खासदारांच्या बाकांवर चढून गोंधळ घातला, अध्यक्षांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. शिवाय सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र विधिमंडळाने दोन्ही सभागृहांसाठी (विधानसभा आणि विधानपरिषद) गॅलरी पास देणे बंद करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपासभापती डॉ. निलम गोऱ्हे यांसंदर्भात माहिती यांनी दिली.
तर, विधानसभेच्या आमदारांना यापुढे केवळ दोनच पास वितरित केले जाणार असून, अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती यांनीही विधिमंडळ परिसरातील सुरक्षेबाबत सचिवांकडून माहिती घेतली आहे.