कामाच्या ठिकाणी कमी झालेली उत्पादकता, शाळेतील विद्यार्थ्यांची खराब कामगिरी आणि लोकांचा कमी झालेल्या चांगल्या कार्यातील नागरी सहभाग आणि सामाजिक नात्यांचा वियोग, हा एकटेपणशी संबंधित आहे.
आपल्या सर्वांना कधी ना कधी आयुष्यात एकटेपणा जाणवतो. अलीकडे असे बर्याच लोकांनी नमूद केले आहे की, त्यांना बर्याच वेळा एकटेपणा जाणवतो. पण, सामाजिकदृष्ट्या अलिप्तपणाच्या भावनेने येणारी वेदना ही आपण मानवी असण्याचा भाग आहे का? जेव्हा जेव्हा आपण एकटेपणा अनुभवतो तेव्हा जग इतके वेगळे का भासते? अलीकडच्या संशोधनातून या प्रश्नावर काही उत्तरे मिळू लागली आहेत आणि असे दिसून आले की, एकाकीपणाचा तुमच्यावर भयानक परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेच्या ‘युएस सर्जन जनरल’ने चक्क एकाकीपणा आणि वेगळेपणाची ही समस्या महामारी म्हणून घोषित केली आहे. १४२ देशांमध्ये घेतलेल्या नवीन सर्वेक्षणात, तुम्हाला किती एकटेपणा वाटतो? या प्रश्नातून असे आढळले की, तरुण प्रौढांमध्ये एकाकीपणाचा दर सर्वाधिक आहे. १९ ते २९ वयोगटातील २७ टक्के तरुण प्रौढांनी गंभीर प्रमाणात किंवा काहींनी बर्यापैकी एकटेपणाची भावना नोंदवली आहे. वृद्ध (१७ टक्के) नागरिकांनी सर्वांत कमी प्रमाणात एकटेपणाची भावना नोंदवली. ‘कोविड-१९’ महामारीच्या पूर्वीच, अमेरिकेतील दोनपैकी एका व्यक्तीला एकाकीपणाचा अनुभव येत असल्याचे नोंदवले गेले आहे. १८ ते २४ वयोगटातील तरुणांमध्ये दहा पैकी जवळपास आठ जणांनी एकटेपणा जाणवत असल्याचे सांगितले. या वयोगटाने त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या काळात या साथीच्या आजाराने शाळेत किंवा महाविद्यालयाला जायला न मिळाल्याने किंवा ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे सामाजिक नात्यांच्या विकासाच्या संधी गमावल्याने खूप नुकसान झाल्याचेही अधोरेखित केले आहे.
प्रौढत्वाच्या संक्रमणकालीन अवस्थेत असलेले तरुण जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये अनिश्चिततेचा अधिक अनुभव घेतात. ज्यात अशांत, अस्थिर प्रेम जीवन, व्यावसायिक अनिश्चितता यांसारख्या गोष्टी अंतर्भूत आहेत. म्हणून तरुणांना वृद्धांपेक्षा गंभीर एकाकीपणाचा अनुभव येण्याची शक्यता अधिक असते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इशारा दिलाच आहे की, एकटेपणा ही लवकरच जागतिक महामारी बनू शकते, ज्याचा संबंध स्मृतिभ्रंश, हृदयरोग, पक्षाघात आणि अकाली मृत्यूशी असू शकतो. ‘डब्ल्यूएचओ’ने आपल्या संकेतस्थळावर नमूद केले आहे की, या जगात कोणीही, कोठेही, एकटे किंवा सामाजिकरित्या अलिप्त असू शकते. सर्व वयोगटात आणि प्रदेशांमध्ये, एकाकीपणा आणि सामाजिक वेगळेपणाचाआपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर आणि आपल्या जमातीच्या आणि समाजाच्या कल्याणावर गंभीर परिणाम होतो. एकाकीपणाचे दर जगभरात सारखेच दिसून येतात. तरुण जसजसे एकटे पडत जातात आणि सर्व सामाजिक आणि आर्थिक जबाबदार्यांमधून माघार घेऊ लागतात, तेव्हा ती परिस्थिती जगासाठी नक्कीच चिंताजनक आहे.
सामाजिक सुरक्षितता, कुटुंब बनवायची संधी व मुले होण्याच्या संधी इत्यादीसाठी सामाजिक नातीगोती आणि संबंध प्रत्येकाच्या आयुष्यात निर्णायक आहेत. आपल्याला एकटेपणाची भावना नकोशी वाटते आणि ही अप्रिय वस्तुस्थिती आपल्याला इतरांशी पुन्हा ‘कनेक्ट’ होण्यास प्रवृत्त करते. पण, ते वाटते तितके सोपे नाही. एकटेपणाची भावना व्यक्तीला सामाजिक माघार घेण्यास प्रवृत्त करते आणि लोकांशी संपर्क साधण्यासाठी अडचणी आणू शकते. खराब किंवा अपुर्या सामाजिक संबंधांचे शारीरिक आरोग्य परिणामांमध्ये आपल्याला हृदयरोगाचा २९ टक्के वाढलेला धोका, स्ट्रोकचा ३२ टक्के वाढलेला धोका आणि वृद्ध प्रौढांसाठी स्मृतिभ्रंश होण्याचा धोका ५० टक्के वाढलेला दिसून येतो.
याव्यतिरिक्त, सामाजिक संबंध नसल्यामुळे अकाली मृत्यूचा धोका ६० टक्क्यांपेक्षा जास्त वाढतो. आपल्या शारीरिक आरोग्याव्यतिरिक्त, एकटेपणा आणि सामाजिक दुरावा मानसिक आरोग्याच्या आव्हानांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. क्वचितच किंवा कधीही एकटेपणा न अनुभवणार्या लोकांपेक्षा सातत्याने एकटेपणाची भावना अनुभवणार्या प्रौढांमध्ये उदासीनता निर्माण होण्याचा धोका दुपटीने जास्त असतो. बालपणात एकटेपणा आणि सामाजिक दुराव्यामुळे वर्तमानात आणि भविष्यातही नैराश्य आणि चिंता यांचा धोका अधिक वाढतो. अमेरिकेतील मानसिक आरोग्य संकटाला पूर्णपणे तोंड देण्यासाठी एकाकीपणा आणि अलिप्तपणाची भावना दूर करणे आज महत्त्वाचे आहे. भारतात त्या मानाने ही परिस्थिती आपल्या कुटुंबवत्सल आणि बंधुभावाच्या शाबूत भावनेने काबूत आहे.
पण, आज जगात लाखो लोक अनुभवत असलेला एकटेपणा या मूक मानसिक आरोग्य संकटाचे आपल्या मानसिक आरोग्यावर, शारीरिक आरोग्यावर आणि सामूहिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आपण मान्य केले पाहिजे. एकटेपणा आणि सामाजिक दुरावा संपूर्ण समाजालाच त्रासदायक ठरतो. कामाच्या ठिकाणी कमी झालेली उत्पादकता, शाळेतील विद्यार्थ्यांची खराब कामगिरी आणि लोकांचा कमी झालेल्या चांगल्या कार्यातील नागरी सहभाग आणि सामाजिक नात्यांचा वियोग, हा एकटेपणाशी संबंधित आहे. जेव्हा आपण एकमेकांमध्ये कमी भावनिक, मानसिक गुंतवणूक करतो, तेव्हा आपण ध्रुवीकरणास अधिक संवेदनाक्षम असतो आणि अनेक वेळा आपण एकट्याने सोडवू शकत नसलेल्या हवामान बदल, दंगल आणि बंदुकीच्या हिंसाचारापासून ते आर्थिक असमानता आणि भविष्यातील साथीच्या रोगांपर्यंत अशा अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्यास कमी पडतो.
मिर्झा गालिबने म्हटले आहे की, “हरवलात तरी फिरत फिरत तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचाल, पण जे घराबाहेर पडतच नाहीत, तेच खरे हरवलेले आहेत. एकत्रितपणे, आपण एक असे जग तयार करू शकतो, जे कमी एकाकी, अधिक निरोगी आणि जास्त लवचिक आहे.” (क्रमशः)