उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये बर्न हॉस्पिटलसाठी उभारा!, अधिवेशनात आ. महेश लांडगे यांची मागणी

11 Dec 2023 20:14:54
BJP MLA Mahesh Landage In Session

नागपूर :
पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जाते. व्यापारी आणि निवासी तसेच औद्योगिक अस्थापना सर्वाधिक आहेत. मात्र, आगीची दुर्घटना घडल्यास जखमींना तात्काळ उपचार मिळावेत. यासाठी शहरात बर्न हॉस्पिटल उभारावे, अशी आग्रही मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली.
 
विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेनश सुरू आहे. दि. ८ डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथील ज्योतिबानगर येथे फायर कँडल कंपनीमध्ये आग लागली. त्यामध्ये आतापर्यंत ९ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि उपायोजना कराव्यात याबाबत सभागृहात चर्चा झाली.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांहून अधिक आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आहे. मात्र, शहरात बर्न वॉर्ड किंवा रुग्णालय नाही. त्यामुळे राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला बर्न हॉस्पिटल किंवा वॉर्ड निर्माण करण्यातबाबत निर्देश देण्यात यावेत, अशी आग्रही सभागृहात केली आहे. तसेच, राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथजी शिंदे यांनी तळवडे आग प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली. याबद्दल आमदार लांडगे यांनी आभारही मानले आहेत.

तळवडे आग दुर्घटनेतील जखमी आपत्तीग्रस्तांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करावे लागले. यापूर्वीही शहरात आगीच्या घटना घडत असतात. गेल्या वर्षभरात आगीत जखमी झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील १३० हून अधिक रुग्णांना पुण्यात उपचारासाठी जावे लागले. शहरात महापालिकेचे वायसीएम आणि अन्य रुग्णालये आहेत. मात्र, बर्न वॉर्ड सुविधा नाही. एखादी मोठी दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा बर्न वॉर्ड सुविधा किंवा आधुनिक उपचार पद्धती असलेले बर्न हॉस्पिटल उभारावे, अशी मागणी केली आहे. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिले आहे. याबाबत महायुती सरकार निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास आहे.
-महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजप, पिंपरी-चिंचवड.
Powered By Sangraha 9.0