नागपूर : महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी नुकतेच खापरखेडा-कोराडी औष्णिक विद्युत केंद्र येथे एफ.जी.डी. उभारणीच्या प्रगतीपर कामांची पाहणी करून दर्जेदार कामासह अधिक वेग वाढवून मार्च २०२४ मध्ये कोराडी(एक संच) आणि खापरखेडा(दोन संचांना) एफ.जी.डी प्रणाली सुरु करणार असल्याचे सांगितले.
महानिर्मितीने राज्यभरात सुमारे २० संचांना एफ.जी.डी. प्रणाली लावण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये २१० मेगावाट-३ संच, २५० मेगावाट-५ संच,५०० मेगावाट-८ संच, ६६० मेगावाट-४ संचांचा समावेश आहे. भुसावळ ६६० मेगावाट संचामध्ये आणि कोराडी येथील प्रस्तावित दोन बदली संचांकरिता एफ.जी.डी. सह संयंत्र उभारणी होणार आहे तर ४ संचांना एफ.जी.डी. आदेश देण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
उप मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण विषयक नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन एफ.जी.डी. लावण्या विषयी महानिर्मितीला सूचना केल्या होत्या त्यात विशेषतः नागपूर जिल्ह्याच्या कोराडी-खापरखेडा वीज केंद्राला प्राधान्याने लावण्याविषयी निर्देश दिले होते त्यानुसार आता लवकरच मार्च २०२४ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील तीन वीज संचांना ही प्रणाली लागणार असल्याने डॉ. पी. अनबलगन यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.
पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालय भारत सरकार यांचे ७ डिसेंबर २०१५ च्या अधिसूचनेनुसार औष्णिक विद्युत प्रकल्पांकरिता सल्फर डाय ऑक्साईड SO2 ची उत्सर्जन पातळी नियंत्रणात राखण्याबाबत नवीन मानके निर्गमित करण्यात आले आहेत त्यानुसार महानिर्मितीने कोळशावर आधारित सुमारे २३ वीज संचांकरिता रुपये ५२२९ कोटींची गुंतवणूक करून फ्ल्यू गॅस डी सल्फरायझेशन (एफ.जी.डी.) संयंत्र उभारणीचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच भुसावळ ६६० मेगावाट नवीन संचांकरिता एफ.जी.डी.उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे लवकरच औष्णिक विद्युत उत्पादन अधिक पर्यावरणपूरक होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील एफ.जी.डी. तपशील : एफ.जी.डी. प्रणाली उभारणीमध्ये नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र २१० मेगावाट संच क्रमांक ३ आणि ४ (११९ कोटी), कोराडी २१० मेगावाट संच क्रमांक ६ (८९ कोटी) येथे कामे अंतिम टप्प्यात असून मार्च २०२४ अखेर ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. कोराडी ६६० मेगावाट संच क्रमांक ८, ९ आणि १० करिता(१३४५ कोटी), खापरखेडा ५०० मेगावाट संच क्रमांक ५ (४९८ कोटी) कामाचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खापरखेडा प्रत्येकी २१० मेगावाट क्रमांक १ व २ येथे इलेक्ट्रो स्टेटिक प्रेसिपीटेटर (ई.एस.पी.) अपग्रेडेशनचे (११९ कोटी) काम प्रगतीपथावर असून नागपूर जिल्ह्यासाठी २२९१ कोटींची एफ.जी.डी.-ईएस.पी. कामे युद्धस्तरावर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांनी खापरखेडा वीज केंद्र आणि कोराडी येथील कोळसा प्रयोगशाळेला भेट देऊन दैनंदिन कामाचा आढावा घेतला. भेटी दरम्यान, महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) अभय हरणे, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, राजेश पाटील, डॉ.नितीन वाघ, पंकज नागदेवते प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्य अभियंते विजय राठोड, विलास मोटघरे, संजय कुऱ्हाडे, उप मुख्य अभियंते नारायण राठोड, जितेंद्र टेंभरे,शैलेंद्र गारजलवार, सुदीप राणे, शिरीष वाठ, कैलास मुल, प्रफुल्ल कुटेमाटे, प्रवीण रोकडे, अधीक्षक रसायनशास्त्रज्ञ राजेश चिव्हाणे तसेच संबंधित प्रकल्प, संवसु अधिकारी आणि प्रकल्प उभारणी करणाऱ्या एजन्सीजचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.