मुंबई : तुमचा मागचा अनुभव चांगला आहे की, नाही ते मला माहिती नाही. परंतू, आता आपण सोबत आलो तर चांगलं काम करुया, अशी टिपण्णी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्यावर केली आहे. त्यामुळे त्यांनी कुमार विश्वास यांना थेट ऑफरच दिल्याचे बोलले जात आहे.
'द सी.एस.आर. जर्नल एक्सीलेन्स अवॉर्ड २०२३' कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "कुमार विश्वास यांना संपुर्ण भारत ओळखतो. सध्या ते राजकारणात कमी आहेत. पण आपण सोबत चांगले काम करु. कारण आमचे सरकार हे 'आम आदमी'चे सरकार आहे," असे ते म्हणाले.
तसेच "आमच्या सरकारचे सगळे निर्णय सामान्य जनतेच्या हिताचेच आहेत. त्यामुळे तुमचा राजकारणातील मागचा अनुभव चांगला आहे की, नाही ते मला माहिती नाही. परंतू, आता आपण सोबत काम करुया," असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी कुमार विश्वास यांना शिवसेनेत येण्याची थेट ऑफरच दिली. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी कुमार विश्वास यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. या कार्यक्रमामध्ये भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मंत्री सुधीर मुनगंटीवर हे उपस्थित होते.