मुंबई : आगामी शिक्षक, सिनेट, पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी सुरू झाली आहे. परंतु, मतदारांना अर्ज भरताना विविध समस्या येत असल्याने अनेकजण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबरच्या पदवीधर मतदारांच्या अधिसूचनेत ओटीपी पडताळणी अनिवार्य असल्याचा उल्लेख नव्हता. या अधिसूचनेनंतर ३ दिवसांनी ओटीपी पडताळणी अनिवार्य करण्यात आली. आधीच्या सूचनेच्या ५ दिवसानंतर एक स्वतंत्र अधिसूचना जारी करण्यात आली होती, ज्यात नमूद केले होते की ऑनलाईन भरलेले सर्व फॉर्म ऑफलाईन देखील भरलेले आहेत. ५ दिवसानंतर दुसऱ्या अधिसूचनेत नमूद केलेले कलम मागे घेण्यात आले, असे भाजयुमोने म्हटले आहे.
मतदारांना नोंदणी करण्याची प्रक्रियाच १० नोव्हेंबरपर्यंत समजली. तसेच सणासुदीमुळे मतदारांना अर्ज भरता आले नाहीत. त्यात तांत्रिक अडचणीमुळे नोंदणीची प्रक्रिया योग्य प्रकारे झाली नाही. त्यामुळे लाखो मतदार या निवडणुकीपासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे मतदार नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे.