ठाण्याच्या या व्यासपीठावरून प्रभावी वक्ते घडावेत : निरंजन डावखरे

09 Nov 2023 19:33:10
vasantrao davkhare Elocution Competition



ठाणे
: ठाण्यात समन्वय प्रतिष्ठानच्यावतीने स्व. वसंतराव डावखरे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. ही स्पर्धा वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील ३० पेक्षा जास्त महाविद्यालयाच्या एकूण ४६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान ही स्पर्धा दरवर्षी होणार असून जास्तीत जास्त तरुणांनी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा आणि त्यातून प्रभावी वक्ते घडावेत अशी आशा बक्षीस समारंभाच्या वेळी समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.


या स्पर्धेत विविध विषयांवर, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भविष्यावर तरुण पिढीची परखड आणि प्रगतिशील मतं मांडली गेली. उस्फूर्त फेरीच्या सादरीकरणात सुद्धा स्पर्धकांचा उत्स्फूर्तपणा स्पष्टवक्तेपणा आणि प्रामाणिकपणा दिसून आला. स्पर्धेचे परीक्षण लेखक,दिग्दर्शक,अभिनेता विनोद गायकर, अभिजीत झुंजारराव, आणि लेखिका वृंदा दाभोळकर ह्यांनी केले.नियोजन समितीने दिलेले स्पर्धेचे विषय हे आजच्या काळाला धरून आणि आजच्या पिढीला विचार करायला लावणारे होते असे कौतुक देखील स्पर्धक आणि परीक्षकांनी केलं.


समन्वय प्रतिष्ठान आणि मोरया इव्हेंट्स अँड इंटरटेनमेंट यांच्या आयोजन आणि नियोजनाचे कौतुक स्पर्धकांकडून देखील करण्यात आलं. या स्पर्धेत कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक जीवनधारा जायेभाये, द्वितीय क्रमांक अलिषा पेडणेकर, तृतीय क्रमांक अनुष्का गांगल, आणि उत्तेजनार्थ पारितोषिक वेदांती साखरे हिने मिळवले. त्याचबरोबर वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक श्रृती बोरस्ते, द्वितीय क्रमांक विभागून प्रतिक पवार आणि यश पाटील, तसेच तृतीय क्रमांक विभागून संकेत पाटील,सुप्रिम मस्कर आणि उत्तेजनार्थ क्रमांक विवेक वारभुवन , हर्ष नागवेकर यांनी मिळवला.



 
Powered By Sangraha 9.0