मुंबई : मराठी वाहिन्यांवरील जुन्या मालिका विविध कारणांमुळे निरोप घेताना दिसत आहेत. आता यात आणखी एका मालिकेची भर पडली असून स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठिपक्यांची रांगोळी प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. गेली काही वर्ष प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचा ७ नोव्हेंबर रोजी या शेवटचा भाग शूट झाला. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेने फार कमी काळात प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मालिकेतील शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या ही पात्र तर महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली.
मालिकेचे कथानक हे एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असल्यामुळे आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात एकत्र कुटुंब असणं किती महत्त्वाचं असतं हे या मालिकेमुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळाली होती.