मुंबई : साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' हा चित्रपट १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनाच्या आधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'श्यामची आई' या चित्रपटाला अॅडव्होकेट बिना पै यांनी भारतातील पहिल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जुन्या 'श्यामची आई' चित्रपटातील गाणी, कथानक यांची उचलेगिरी केल्याप्रकरणी नवीन 'श्यामची आई' चित्रपट निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे.
१९५३ साली आचार्य अत्रे यांनी जुन्या 'श्यामची आई' हा चित्रपट निर्मित आणि दिग्दर्शित केला होता. मात्र, आता सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई या चित्रपटातील कथा, प्रसंग, गाणी यांच्या पुनर्वापरासाठी कोणतीही संमती न घेता कॉपी राईट कायद्याचा भंग केल्याचा आरोप करत नव्या 'श्यामची आई' चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाले की, “आदर्श संस्कारांसाठी ज्या 'श्यामची आई' या पुस्तक आणि चित्रपटाचा मराठी माणसांवर आजही प्रभाव आहे, तोच कथाविषय असा नव्याने चूकीच्या कारणावरून वादग्रस्त ठरावा हे अत्यंत क्लेशदायक आहे”.
दरम्यान, ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक सुजय डहाके यांनी भारतातील राष्ट्रीय पुरस्काराचे पहिले सुवर्ण कमळ मिळवणाऱ्या या चित्रपटाला २१ व्या शतकातही कृष्णधवल रंगातच सादर केले आहे. या चित्रपटात अभिनेता ओम भूतकर साने गुरुजींच्या मोठेपणीची भूमिका साकारत असून शर्व गाडगीळ यावे साने गुरुजींची बालपणीची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री गौरी देशपांडे हिने साने गुरुजींच्या आईची भूमिका आणि अभिनेता संदीप पाठक याने साने गुरुजींच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.