मस्कच्या 'टेस्ला'चा लवकरच भारत प्रवेश; वाणिज्य मंत्री पीयूष गोयल घेणार इलॉन मस्कची भेट

09 Nov 2023 18:37:38
 tesla
 
नवी दिल्ली : इलॉन मस्क आणि भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची लवकरच भेट होऊ शकते. पीयूष गोयल पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते इलॉन मस्क यांना भेटण्याची शक्यता आहे. या दोघांची ही भेट खूप महत्त्वाची मानली जात आहे. टेस्ला लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे.
 
याआधी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलॉन मस्क यांची अमेरिका दौऱ्यावर भेट घेतली होती. त्यानंतर ही उच्चस्तरीय बैठक पहिल्यांदाच होणार आहे. टेस्ला २०२१ पासून भारतात प्रवेश करण्यास उत्सुक आहे. पण भारताने टेस्लाला भारतातच उत्पादन सुरु करण्यास सांगितले होते. त्यामुळे टेस्लाला भारतीय बाजारपेठेमध्ये येऊ शकली नाही.
 
पीयूष गोयल यांच्यासोबतच्या बैठकीत कार आयातीबाबत भारताच्या नव्या धोरणावर चर्चा होऊ शकते. या धोरणामुळे कार कंपन्यांना १५ टक्के कमी ड्युटीवर पूर्णपणे तयार कार आयात करण्याची परवानगी मिळेल. सध्या भारतात आयात होणाऱ्या कारवर आयात कर जास्त आहे.
 
टेस्ला भारतात आपल्या कार सुरुवातीला आयात करणार असली तरी, लवकरच टेस्ला कंपनी भारतात कार निर्मिती सुद्धा सुरु करणार आहे. यानंतर भारतात बनलेल्या टेस्ला कंपनीच्या कार जगभरात निर्यात केल्या जातील.
 
 
Powered By Sangraha 9.0