मुंबई : ईडी चौकशीदरम्यान किशोरीताईंना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी होणार होती. मात्र, पेडणेकरांनी ४ आठवड्यांचा वेळ मागितला आहे. किशोरी पेडणेकर यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. १ हजार ३०० रुपये किंमतीची बॉडीबॅग ६८०० रुपयाला विकत घेण्यात आल्याचा आरोप आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू, परचेस डिपार्टमेंटचे उपायुक्त रमाकांत बिरादर आणि वेदांत इन्फो लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी होत आहे.
चौकशीपूर्वी किशोरी पेडणेकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "आज ईडी कार्यालयात जात आहे. आज हजर राहण्याचं जे समन्स आहे. हा चौकशीचा भाग आहे. त्यांना सहकार्य करणं आपलं काम आहे. मुंबईकरांसाठी आम्ही चांगलं काम केलं आहे. हिशोब सर्वांना द्यावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगेन मी काहीही केलेलं नाही. चौकशी यंत्रणात राजकारण घुसली आहे." असं पेडणेकर म्हणाल्या.