नितीशकुमार चालते व्हा!

08 Nov 2023 19:44:57
Bihar CM Nitish Kumar Statement

लैंगिक संबंधाबाबत इतक्या घाणेरड्या पद्धतीने हातवारे करण्याची बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची कला पाहून अश्लील चित्रपट म्हणून शिक्कामोर्तब झालेल्या ‘बी ग्रेड सिग्रेड चित्रपट’ आणि वेबसिरीजचे नायक तर सोडाच खलनायकही त्यांना गुरू मानतील. ‘ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या’ त्या न्यायाने नितीशकुमार हे जेव्हापासून काँग्रेस आणि लालूची सोबत करायला लागले. तेव्हापासून त्यांच्यात भयंकर बदल झाले आहेत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिहार विधानसभेत त्यांनी केलेले अक्षम्य आणि अत्यंत लाज आणणारे वक्तव्य. जगभरात सजीव आणि त्यांची लैंगिकता यासंदर्भात काही मर्यादा आहेत. या मर्यादा जगभरात पाळल्या जातात. स्त्री आणि पुरुष लैंगिक संबंध ठेवतात हे नितीशकुमार यांनी अश्लील शब्दात आणि त्याहीपेक्षा अश्लील अविर्भावात हातवारे करून का सांगावे? त्यातून त्यांनी जनतेचे कोणती जागृती केली कोणता विकास केला असेल? या वयात आणि तेही इतक्या सन्माननीय पदावर असताना नितीश यांना हे असले धंदे का सुचले असतील? नितीश यांच्यावर सर्वत्र टीका झाल्यावर त्यांनी दोन्ही सदनात याबद्दल माफी मागितली. पण अपेक्षेप्रमाणे काँग्रेस आणि लालू नितीशला समर्थन देत आहेत. लालू पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांने तर अकलेचे तारेच तोडले तो म्हणाला मुख्यमंत्री नितीशकुमार जे बोलले ते लैंगिक शिक्षणाचा भाग होता. शाळेतही हा विषय शिकवला जातो. विज्ञान जैव विज्ञानामध्ये लहान मुल हे सगळ शिकतात. व्यावहारिक स्वरूपात हे आपण शिकायची गरज आहे. बिहार काँग्रेसची नेता नितू सिंह म्हणाली की, नितीश काहीही चुकीचे बोलले नाहीत. काय म्हणावे? लोकशाहिचे पवित्र सत्तास्थान असणार्‍या विधानसभेमध्ये काय लैंगिकतेचा वर्ग सुरू होता? मुख्यमंत्र्यांनी ती बैठक काय लैंगिक शिक्षण देण्यासाठी घेतली होती? दुसरे असे की, नितीश स्मृतीभंश आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे ते कुठेही काहीही बोलतात आणि करतात, असेही काही जण म्हणतात. पण पुन्हा मुद्दा असा आहे की, त्यांचा जर स्मृतीभंश झाला आहे, तर अश्लील बोलताना अश्लील अविर्भाव करायचे हे कसे त्यांना कळले? मतांसाठी समाजात जातीभेदाची तेढ माजवायची आरक्षणाचा मुद्दा पेटवायचा हे त्यांना कसे कळते? सर्वात महत्त्वाचे म्हणजे या माणसाला पंतप्रधान व्हायचे आहे! ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ याचा संदर्भ अश्लीलरित्या लैंगिकसंबंधाशी जोडणार्‍या नितीश कुमारांनी आता घरी बसावे यातच बिहारच्या बहुबेटीचा सन्मान आहे.

बिहार आणि बालिका
 
दुर्मीळातील दुर्मीळ अत्याचाराच्या घटना म्हणून ज्यांचा उल्लेख करावा, असे बालिकांवरचे अत्याचार बिहारमध्ये सातत्याने होत आहेत. एप्रिल २०२३ ची बिहार पुर्णीय जिल्ह्यातली घटना. काही छोट्या मुली खेळत असताना एक २६ वर्षांचा विकृत माणूस आला त्याने मुलींच्या अंगावर दगड मारायला सुरुवात केली. मुली पळून जाऊ लागल्या त्यामध्ये मागे राहिलेल्या दहा वर्षांच्या मुलीला त्याने पकडले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिच्या शरीरात माती आणि वाळू भरली. मे २०२३ मध्ये बिहारच्या वैशाली जिल्ह्यात घरातून मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिला जबरदस्तीने विष पाजले. दहा वर्षांची मुलगी मेंदीची पान तोडायला गेली. एका घराजवळ मेंदीची पान तोडत असताना मुलीला त्या घरमालकाने तिला पकडले. त्याच्यासकट त्या घरातील इतर पुरुष आणि नोकरानेही तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिचा खून केला आणि घरातच दहा फूट खड्डा खणून तिचा मृतदेह त्यात गाडून टाकला. घटना आहे, बिहारच्या बेगुसरायमधली आणि जुलै २०२३ची. दुसरी घटना बिहारच्या बक्सर जिल्ह्यातली. त्याला दोन मुलीच होत्या. अल्पवयीन बालिका मुली. कसही करून मुलगा व्हायलाच हवा, यासाठी त्याने तांत्रिकाची मदत घेतली. तांत्रिकाने सांगितले की, तू तुझ्या त्या दोन छोट्या मुलींशी लैंगिक संबंध ठेव. त्याच्या पत्नीने आणि काकीने त्याला मदत केली. पुढे तांत्रिकाने सांगितले की, त्याच्या अल्पवयीन मुलींसोबत तांत्रिकाने लैंगिक संबंध ठेवले तरच त्या माणसाच्या इच्छा पूर्ण होतील. त्या बालिकांवर तांत्रिकाने बलात्कार करणे सुरू केले. ही घटनाही सप्टेंबर २०२३ सालची. एक १३ वर्षांची मुलगी तिच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या, तर तिच्या पोटात तीन महिन्यांचे मृत अभ्रक. तालीम देतो असे सांगत मशिदीच्या इमामने तिच्यावर बलात्कार केला होता ही घटना ऑक्टोबर २०२३ सालची बिहारच्या सहरसा जिल्ह्यातली. बिहारमध्ये बालिकासोबत होणार्‍या अत्याचाराची संख्या चिंतनीय आणि दुःखद आहे. विकृत लिंगपिसाट दर्जाचे लैंगिक संबंधात बरबटलेले हिणकस विधान भर विधानसभेत करणारे नितीशकुमार बालिकांवर होणार्‍या अत्याचारावर बोलणार तरी काय? कारण, त्यासाठी त्यांच्याकडे तेवढी संवेदनशीलता आणि संस्कारशीलताही हवी ना? भव्य ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा असणाार्‍या बिहारला नितीशकुमार यांनी लज्जीत केले आहे.

९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0