उत्तर प्रदेशच्या अलिगढचे होणार ‘हरिगढ’!

07 Nov 2023 17:43:59

uttar pradesh

नवी दिल्ली :
उत्तर प्रदेशमधील ‘अलिगढ’ शहराचे नाव बदलून ‘हरिगढ’ करण्याचा प्रस्ताव अलिगढ महानगरपालिकेत मंजुर झाला आहे. हा प्रस्ताव राज्य शासनास पाठविण्यात आला असून त्यांच्या मंजुरीनंतर नाव बदलले जाणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली गुलामगिरीची चिन्हे पुसून टाकण्यास प्रारंभ झाला आहे.

यामध्ये शहरांना देण्यात आलेली मुस्लिम आक्रमकांची नावे अथवा भारतीय संस्कृतीशी कोणताही संबंध नसलेली नावे बदलण्याचे अतिशय महत्त्वाचे धोरण योगी सरकारने ठेवले आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातील ‘अलिगढ’ या शहर - जिल्ह्याचे नाव बदलून ‘हरिगढ’ करण्यात येणार आहे.अलिगढ महानगरपालिकेचे महापौर प्रशांत सिंघल यांनी त्याची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सोमवारी महापालिकेच्या सभेत मांडण्यात आला, तो एकमताने मंजूर करण्यात आला.

आता हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात येणार असून, तेथून मंजुरी मिळताच नाव बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासन लवकरच या प्रस्तावाची दखल घेईल आणि ‘अलिगढ’चे नामकरण ‘हरिगढ’ असे केले जाईल, अशी अपेक्षा आहे. ‘अलिगढ’चे नाव बदलून ‘हरिगढ’ करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती, असेही महापौर यांनी सिंघल यांनी म्हटले आहे.

निर्णय अपेक्षित
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे काही दिवसांपूर्वी अलिगढला आले होते, त्यावेळी त्यांनी ‘हरिगढ’ असा उल्लेख केला होता. तेव्हापासूनच अलिगढचेही नामांतर होणार, असे कयास लावले जात होते. त्यामुळे आता अधिकृतपणे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वीही अलाहाबादचे प्रयागराज आणि फैजाबादचे अयोध्या असे नामांतर करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0