डॉ. सलीम अली यांच्या वस्तु आणि चित्रफितींचे प्रदर्शन

07 Nov 2023 17:01:41


Dr. Salim Ali exhibition



मुंबई (विशेष प्रतिनिधी):
पक्षी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) मध्ये डॉ. सलीम अली यांच्या वस्तुंचे, त्यांनी स्वतः काढलेल्या चित्रफितींचे आणि त्यांच्या काही पत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रविवार दि. ५ नोव्हेंबरपासुन ते शुक्रवार दि. १० नोव्हेंबर दरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.



Dr. Salim Ali exhibition
‘द बर्डमॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेले डॉ. सलीम अली यांची वन्यजीव आणि पक्ष्यांविषयीची कारकिर्द फारच मोठी आणि उल्लेखनीय आहे. त्यांच्या संपुर्ण कारकिर्दीमध्ये डॉ. सलीम अली यांनी वापरलेले कॅमेरा, टेलिस्कोप, व्हिडीओ शुटिंगसाठी वापरलेली यंत्र सामुग्री, टाईपराईटर, टेप रेकॉर्डर, पक्षी निरिक्षणासाठी वापरलेली दुर्बिन अशा साहित्याचे प्रदर्शन मांड़ण्यात आले आहे. त्याचबरोबर, फिल्डवरील त्यांच्या अभ्यासादरम्यान त्यांनी घेऊन ठेवलेल्या नोंदींची वही, त्यांना लहान मुलांपासुन ते मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांकडुन मिळालेली पत्रे, भेटकार्ड यांचे काही निवडक नमुने या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. हे सर्व साहित्य आपल्याकडे होतं मात्र, प्रथमच ३० वर्षांनंतर हे प्रदर्शन स्वरुपात मांडण्यात येत आहे, अशी माहिती बीएनएचएसच्या ग्रंथपाल आणि या प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या निर्मला बरुरे यांनी मुंबई तरूण भारतशी बोलताना दिली.



Dr. Salim Ali exhibition

डॉ. सलीम अली यांनी स्वतः पक्ष्यांना रिंगीग केलेले असल्याच्या चित्रफितींचे स्क्रिनींग इथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत करण्यात येत आहे. रिंग केलेला पक्षी शिकारी किंवा स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी पाठवलेली गमतीशीर पोस्टकार्डे ही या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. पर्यावरण आणि विशेषतः पक्षी प्रेमींसाठी हे प्रदर्शन म्हणजे वेगळेच मेंदुचे खाद्य देऊन जाणारं आहे.
“डॉ. सलीम अली यांचं पक्षी क्षेत्रातील अद्वितीय कार्य सामान्यांपर्यंत पोहोचायला हवं या उद्देशातुन हे प्रदर्शन आयोजित करण्याचं आम्ही निश्चित केलं. तसेच, यानिमित्ताने डॉ. सलीम अली यांच्या वस्तु, टिपणं, नोंदवह्या हे सर्व संग्रही ठेऊन पुढील पिढीसाठी जतन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.”

- निर्मला बरुरे
ग्रंथपाल, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी
“डॉ. सलीम अली यांचं काम अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा आमचा प्रयत्न आहे. हे प्रदर्शन मांडल्यानंतरही अनेक ठिकाणांहुन सलीम अली यांचे हे साहित्य आमच्याकडे आहे... असे फोन, मेसेज आले आणि त्यानिमित्ताने या संग्रहात आता आणखी भर पडणार आहे.”

- किशोर रिठे
संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी 





Powered By Sangraha 9.0