एक पणती शिक्षणाची...

07 Nov 2023 22:39:12
Article on Let's Imagine Institute

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी साजरी करायला आम्ही विक्रमगड आणि वाड्याच्या शाळांना भेट द्यायचे ठरवले. यानिमित्ताने चित्रकार श्री. बा.च्या कला कार्यशाळेचे आयोजन केले होते. मुलांनी शाळेच्या परिसरातील खर्‍या फुलापानांना, गवतांना, वेलींना... चिकटवून त्याची सुबक नक्षी तयार करून एन्व्हलप पेंटिंग केलेली होती. गेली तीन-चार वर्षे आमची ‘लेट्स इमॅजिन संस्था’ अशा प्रकारे कलेचा आस्वाद घेत या मुलांबरोबर दिवाळी साजरी करतेय. त्याविषयी...

ही एन्व्हलप मुलांनी तयार केली. इतकं सुंदर आणि क्रिएटिव्ह सुचतं तरी कसं मुलांना? मुलांनी केलेली एन्व्हलप आणि पणत्या पाहतानाघरी आलेल्या पाहुण्यांच्या चेहर्‍यावर आश्चर्य आणि कुतूहल असे संमिश्र भाव होते. शाळेच्या परिसरातील खर्‍या फुलापानांना, गवतांना, वेलींना चिकटवून त्याची सुबक नक्षी तयार करून एन्व्हलप पेंटिंग केलेली होती. तोच विचार पणत्या रंगविताना केलेला. पाहुण्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि कौतुकाचे शब्द आत्मिक समाधान देऊन गेला. डोळ्यांसमोर पुन्हा हे चित्र उभे राहिले.

यावेळीही दिवाळी साजरी करायला आम्ही विक्रमगड आणि वाड्याच्या शाळांना भेट द्यायचे ठरवले. यानिमित्ताने चित्रकार श्री.बा.च्या कला कार्यशाळेचे आयोजन केले होते. विक्रमगडच्या सुकसाळे जि. प. शाळेत बोरसेपाडा आणि टोपलेपाडा शाळेतील मुलं येणार होती. या मुलांसाठी पणती रंगविणे, एन्व्हलप पेंटिंग आणि रांगोळीचा टीप कागद तयार करणे, हा कलाप्रकार नवीनच होता. नक्की काय करायचं आहे, याबद्दल उडालेला गोंधळ प्रत्येक मुलाच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. ओमकार दादाने मग नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत मुलांशी बोलायला सुरुवात केल्यावर त्यांना आता कळू लागले की, काहीतरी भारी शिकणार आहोत आपण आज! चित्रकार श्री.बा.नेमग त्याची कल्पना सांगितली आणि मुलं लागली कामाला! इयत्तेप्रमाणे तीन-तीन गट केले. पणत्या रंगविण्याचे काम छोट्या मुलांना देण्यात आले. चौथी, पाचवीच्या मुलांना रांगोळी टीप कागद आणि सहावी, सातवीला एन्व्हलप पेंटिंग. श्री.बा.ने मुलांना आजूबाजूच्या परिसरातील पानं, फूलं, गवत, वेल, जे जे दिसेल आणि आवडेल ते ते घेऊन यायला सांगितले.

मग त्याचं काय करायचं, याची कल्पना देऊन आणि प्रात्यक्षिक मुलांना करून दाखविले. एकापेक्षा एक कलाविष्कार आणि कल्पनेतील चित्र त्या एन्व्हलपवर साकारले जात होते. इकडे छोटी मुलं रंगाची, ब्रशची, रोलरची मजा घेत पणतीला रंगवत होती. त्यात ते एवढे रमून गेले होते की त्यांना भुकेचा विसर पडला होता. दुसर्‍या बाजूला रांगोळीचा टीप कागद बनविण्याचे कामही जोरात सुरू होते. आपणच रंगविलेले एन्व्हलप, पणती बघून झालेला आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. आम्ही तो आनंद, उत्साह मनात साठवून मोजला आलो. मोजमध्ये तर कलाजत्राच भरली आहे की काय असा भास झाला. दोर्‍यांवर टांगून ठेवलेले कंदील, रंगवून तयार असलेल्या पणत्या शाळेच्या अंगणभर पसरल्या होत्या आणि आता एन्व्हलप, रांगोळी टीप कागद श्री.बा. शिकवणार... मग काय मज्जाच मज्जा! खरं तर सहामाही परीक्षेचे दिवस. पण, मुलांच्या चेहर्‍यावर कुठेही परीक्षेचे किंवा अभ्यासाचे टेन्शन दिसत नव्हते. कुठे रंगाचे डबे होते, ब्रश, हातांना, चेहर्‍याला लागलेला रंग...कसलं, कसलंच भान मुलांना नव्हतं. ही रंगीबेरंगी दिवाळी साजरी करण्यात मुलंच काय पण गुरूजीसुद्धा रंगून गेले होते...

हा अनुभव केवळ या वर्षीचा नाही, तर गेली तीन-चार वर्षे आमची ’लेट्स इमॅजिन संस्था’ अशा प्रकारे कलेचा आस्वाद घेत या मुलांबरोबर दिवाळी साजरी करतेय. या कला प्रकारातूनही आनंद मिळतो आणि नकळत खूप काही नवनवीन कल्पना आकारायला येतात. शिकण्याची आणि अनुभवांची समृद्ध देवाणघेवाण होते. फक्त पाठ्यपुस्तकी शिक्षण म्हणजे शिक्षण नाही, तर शिकण्याचे अनेक कलाप्रकारही आहेत. त्यांनाही तेवढंच महत्त्व आहे आणि या कलाप्रकारातून आपली कला, परंपरा, संस्कृती, इतिहास जोपासायला आपसूक मदत होते. नकळत शाळेची ओढ लागते आणि शिक्षणाची गोडी वाढते. याच उद्देशाने आम्ही असे नवनवीन उपक्रम राबवित आहोत.

या वर्षी दिवाळी साजरी करताना ’एक पणती शिक्षणाची’ घरोघरी आणि मनामनातही सतत तेवत राहायला हवी. आमच्या नवनवीन उपक्रमांना आणि ध्येयाला साध्य करण्यासाठी तुमची साथ हवी.

(अधिक माहितीसाठी संपर्क : लेट्स इमॅजिन टूगेदर फाऊंडेशन, मोबाईल क्र. - ९८२०००३८३४)
पूर्णिमा नार्वेकर
Powered By Sangraha 9.0